‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं!’ हे श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेलं आव्हान आजही चर्चेत आहे. महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामा अतिशय अस्वस्थ झाला होता. त्याच्याकडे ब्रह्मास्त्रासारखं प्रचंड शक्तिशाली अस्त्र होतं, पण तरीही त्याला श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र हवे होते. त्याच्या मनात अभिमान होता की त्याच्यासारखा योद्धा जगात नाही, आणि जर सुदर्शनचक्र त्याच्याकडे आलं, तर तो अजिंक्य बनेल.
श्रीकृष्ण आणि अश्वत्थामा यांच्यात सुदर्शनचक्रावरून चॅलेंज. (फोटो सौजन्य - Social Media)

तो श्रीकृष्णाकडे गेला आणि नम्रतेने म्हणाला, “मला तुमचं सुदर्शनचक्र हवं आहे.” हे ऐकून श्रीकृष्ण हसले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं कारण त्यांच्या स्वतःच्या मुलांनी कधीही हे अस्त्र मागितलं नव्हतं.

पण अश्वत्थामासारखा गर्विष्ठ योद्धा ते मागतोय, हे पाहून श्रीकृष्ण म्हणाले “ठीक आहे, जर तुला वाटतं की तू पात्र आहेस, तर उचलून दाखव हे चक्र. उचललंस तर ते तुझं.”

अश्वत्थामा पुढे सरसावला, चक्र उचलण्याचा प्रयत्न केला, पण जसा तो हात लावतो तसंच त्याच्या शरीरात तीव्र उष्णता आणि कंप जाणवतो. चक्र जणू जिवंत असल्यासारखं त्याला दूर फेकतं. कितीही प्रयत्न केला तरी तो ते उचलू शकला नाही. शेवटी तो थकून गेला आणि त्याला आपली मर्यादा कळली.

तो श्रीकृष्णासमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला, “माझा अहंकार माझ्यावर भारी पडला. क्षमा करा.” श्रीकृष्ण शांत स्वरात म्हणाले, “शक्ती फक्त सामर्थ्याने नाही, तर श्रद्धा आणि साधनेने प्राप्त होते.”

या प्रसंगातून श्रीकृष्णाने जगाला एक अमूल्य शिकवण दिली ‘अहंकाराने नव्हे, तर नम्रतेनेच दिव्यता मिळते.’






