अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगर शहरातील मंगलगेट येथील यश किराणा ट्रेडिंग दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व तांदळाच्या १८ गोण्या असा १८ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.१०) घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अमोल टिल्लू गायकवाड (वय ३६, रा. कॅम्प कौलारू, सर्जेपुरा) यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या यश किराणा ट्रेडिंग येथील किराणा दुकानात प्रवेश करून दुकानातील १८ तांदळाच्या गोण्या व रोख रक्कम चोरून नेली, असे फियार्दीत म्हटले आहे.
दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी पोलिस ठाणे गाठत घटनेची फिर्याद दिली. तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांनी घटनास्थळी भेट दिली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.