Bhausaheb Wakchaure joins Uddhav Thackeray Faction : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह आज (२३ ऑगस्ट) उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील मतोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवसस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाकचौरे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीदेखील ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करून वाकचौरे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन
भाऊसाहेब वाकचौरे यांना मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी वाकचौरे यांनी आपली चुक मान्य करीत, यापुढे शिवसेनेला दिल्लीपर्यंत पोहचवणार असल्याचे जाहीर केले. आता जे कोणी शिवसेना संपवण्यासाठी येतील आपल्याला त्यांना संपवायचे आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी वाकचौरे यांनी बोलताना सांगितले. शिवसेना आता फक्त महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या तख्तापर्यंत नेऊन पोहचवायची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी घरवापसी केली आहे
पुढे बोलताना त्यांनी सुबह का भूला शाम को वापस लौटता आहे तो उसे भूला नही कहते. तो मी आहे. मी घर वापसी केली आहे. मी काहीही चूका केल्या असल्या तरी मी घरवापसी केली आहे. तो अपराध मी मान्य करून परत आलो आहे असेही वाघचौरे म्हणाले.
अनेक पदाधिकाऱ्यांनी केला पक्षप्रवेश
आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सगळे जिल्हाप्रमुख, माजी जिल्हाप्रमुख विद्यमान पदाधिकारी सर्व याठिकाणी आले आहेत, भाऊसाहेबांसोबत संजय छिल्लारे यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी आज पक्ष प्रवेश केल्याचे विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब मला भेटले त्यांनी मला मी चूक केली असे सांगितलं की मी तुमची आणि मातोश्रीची माफी मागतो. मी त्यांना शिवसैनिकांची माफी मागा असे सांगितले. आपण राजकारणात पक्षांतरं पाहिले, पण सध्या पक्ष संपवण्याचे कटकारस्थान आपण पहिल्यांदा पाहतोय. तुम्ही सगळे शिवसैनिक दिलदार आहात. जर एखादा चुकला आणि पश्चाताप व्यक्त केला तर शिवसैनिक त्यांना माफ करतो. शिवैनिक चुकीला माफी देतो पण पापाला माफी देत नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
राजकीय प्रवास कसा आहे?
भाऊसाहेब वाकचौरे हे 2009 साली रामदास आठवले यांचा पराभव करून शिवसेनेकडून खासदार झाले होते. 2014 साली उमेदवारी जाहीर होऊन देखील वाकचौरे यांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.