मुंबई – आगामी निवडणूकांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपचा फॉर्मुला अद्याप समोर आलेला नाही. यानंतर वंचित बहुजन आघाडीने मविआमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाबरोबर असलेली युती तोडली आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे सांगितले. परंतु, ही युती एकतर्फी तोडली असल्याचं संजय राऊत म्हणाले. युती तोडताना त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती, असंही राऊत म्हणाले. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर शिवसेनेची युती झाली याला दीड वर्ष झालं आणि ही युती अतिशय चांगल्या हेतूने झालेली होती.त्यात प्रामुख्याने लोकसभेचा विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका यासंदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे, त्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही त्या दोन नेत्यांमधली भूमिका होती. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे. ते एकत्र आले याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला, त्यावेळेला युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती. पण विधानसभा, महानगरपालिका या स्तरावर काम करू असं ठरलं असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.
संजय राऊत पुढे म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं, युती करताना चर्चा झाली तर आपण दूर होताना सुद्धा एकत्रित चर्चा झाली असती तर ती आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. लोकसभेसंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला, हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे, आम्हाला आजही वाटतं राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉ. आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं संविधानाचं, मजबूत लोकशाहीचं, ते संविधान आणि लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचे आहे.” असे मत संजय राऊत यांनी केले.