सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांनी पाणीबिल थकवल्याने त्यांच्या बिलावर विलंब आकार, दंडव्याज लावण्यात आले होते. दरम्यान, अन्यायकारक विलंब आकार माफ करण्याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला मोठे यश मिळाले असून, पाटील यांनी विलंब आकार माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेत थकबाकीदार ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन, महागाई आणि कामधंदा बंद असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या असंख्य ग्राहकांना वेळेत पाणीबिल भरण्यास शक्य झाले नाही. त्यातच प्राधिकरणाने थकीत बिलावर विलंब आकार लावल्याने ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली होती. याबाबत सातारा शहर आणि परिसरातील ग्राहकांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन विलंब आकार माफ करून मिळावा अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. शिवेंद्रसिंहराजे यांनी यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना लेखी निवेदन देऊन आणि समक्ष चर्चा करून ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी विलंब आकार माफी करावी, अशी मागणी केली होती.
ग्राहकांसाठी अभय योजना लागू
शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून गुलाबराव पाटील यांनी केवळ साताऱ्याचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना लागू करून त्याद्वारे पाणीबिलावरील विलंब आकार, दंडव्याज माफ करण्याचा मोठा निर्णय नुकताच जाहीर केला.
या भागातील ग्राहकांना होणार फायदा
यामुळे प्राधिकरणाच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, याचा लाभ लष्कर पाणीपुरवठा केंदांतर्गत येणाऱ्या सदरबझार, शाहूनगर, विसावा नाकामी, गोडोली, शाहूपुरी, खिंडवाडी, खेड, पिरवाडी आदी भागातील तसेच पाचगणी आणि महाबळेश्वर येथील ग्राहकांनाही होणार आहे.