कुर्डुवाडी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्ह्याचे १६० कोटी उद्दिष्टांमधील १३३ कोटीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्ततेतून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध व्यवसाय व त्याचे मार्केटिंग करून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी केले.
पंचायत समिती कुर्डुवाडी येथे बँक ऑफ इंडिया माढा तालुका सर्व शाखा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष उमेदच्या वतीने बचत गटामधील महिलांना कर्ज वितरण प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते. यावेळी माढा तालुक्यातील बँक ऑफ इंडिया मार्फत एकूण ८६ बचत गटांना १ कोटी २५ लाख मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक प्रशांत नाशिककर, विश्वास वेताळ, मिनाक्षी मडीवळी, अमोल सांगळे, सयाजीराव बागल, राहुल मांजरे, शाखा व्यवस्थापक उदय काकपुरे, अजिंक्य आंधळकर, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
दिलीप स्वामी म्हणाले की, बचत गटाच्या महिलांनी दिलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेत पत निर्माण करावी. आज बचत गटांना कर्ज देण्यामध्ये बँका सकारात्मक आहेत. कोविड लसीकरणात उमेद अभियानातील महिलांचे खूप मोलाचे योगदान करत आहेत. त्याबद्दल कौतुक केले. बचत गटाच्या बाबतीत येणाऱ्या विविध अडचणीवर लक्ष असून, त्याच्यावर योग्य मार्ग काढण्याचा निश्चितच प्रयत्न केले जातील. त्यामुळे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे गरजेचे असल्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
यावेळी बँक अर्थ सहाय्य वितरणमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम उद्दिष्ट पूर्ण करून उत्कृष्ट काम केल्याबद्दल माढा तालुका उमेद स्टाफचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले. सदरचा कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख यांनी केले तर तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुका व्यवस्थापक शरद सातपुते, कृष्णा लोंढे, सुषमा बिचुकले, गणेश दोरवट, स्वप्निल सुर्वे व सुदर्शन यादव यांनी परिश्रम घेतले.