मुंबई : मराठी सिनेमा हा नेहमीच आपल्या कथेतून समाजाला आरसा दाखवत आला असून आता असाच एक सामाजिक आणि निसर्ग यांच्यावर आधारलेला ‘जिंदगानी’ (Jindagani) हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
निसर्गाच्या कुशीत राहत असताना त्याच निसर्गाचे आपण ज्यावेळी शोषण करू लागतो त्यावेळी त्या शोषणाने त्याचा होणारा उद्रेक आणि मानवी भावनांच भावविश्व सांगणाऱ्या ‘जिंदगानी’चे दिग्दर्शन आणि लेखन विनायक साळवे (Vinayak Salve) यांनी केले आहे तर सुनीता शिंदे (Sunita Shinde) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खोदडगावाची ही कथा असून या चित्रपटात शशांक शेंडे (Shashank Shende)हे प्रमुख भूमिकेत असून वैष्णवी शिंदे (Vaishnavi Shinde) या नवोदित अभिनेत्रीचे या चित्रपटातून मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलर मधून खोदडगावाशी आपली ओळख होतेच पण त्याच बरोबर आपल्याला या चित्रपटातील मुख्य पात्रांची सुद्धा झलक पाहायला मिळते आहे.
नर्मदा सिनेव्हीजन्सच्या या पहिल्या वहिल्या कलाकृतीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे पुरस्कार मिळवले असून क्राउन वूड या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपट’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. “या चित्रपटाची कथा ही एका गावाची कथा आहे, तिथल्या गावकऱ्यांची ही कथा असून त्याच्या संघर्षाची आणि त्याचबरोबर निसर्गाचं जे शोषण मानव कळत नकळत करतो त्याबद्दल भाष्य हा चित्रपट करतो. चित्रपटाची निर्मिती करण्यामागे हाच हेतू होता की एक उत्तम पर्यावरण चित्रपट लोकांसमोर यावा आणि आपली समाजाप्रती जी जबाबदारी आहे ती पूर्ण व्हावी हे मुख्य उद्देश या निर्मितीच आहे.” असे चित्रपटाच्या निर्मात्या सुनीता शिंदे (Sunita Shinde) म्हणतात. येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत असून या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.