नणद भावजयीमध्ये भांडणं का होतात
लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरच्या घरी जाते तेव्हा ती त्या घरात पूर्णपणे नवीन असते. तिथं सासूशिवाय तिची नणंदेशीही गाठ पडते. वहिनी आणि नणंद यांच्यात वाद होणे हे अगदी सामान्य आहेत, जे भारतीय कुटुंबांमध्ये अनेकदा दिसून येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे नात्यात दुरावा येतो.
खरं तर अनेक घरांमध्ये नणंदाची अधिक लुडबूड दिसून येते आणि त्यामुळेच घरामध्ये वहिनी आणि नणंदेचे नाते टिकत नाही. मात्र अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळे या नात्यात अधिक वाद होताना दिसतात. चला तर मग जाणून घेऊया, वहिनी आणि नणंद यांच्यात भांडणाची महत्त्वाची कारणे कोणती असू शकतात. (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
लक्ष न मिळणे
बऱ्याचदा नणंदेला वाटतं की लग्नानंतर तिचा भाऊ तिच्याकडे लक्ष देत नाही जेवढं आधी द्यायचा. भावाच्या बायकोचा आयुष्यात प्रवेश झाल्यामुळे आपले हक्क कमी होत आहेत असेदेखील तिला वाटू शकते. तर एका बाजूला बायकोला असं वाटतं की आपला नवरा आपल्यापेक्षा त्याच्या आईला आणि बहिणीला अधिक मान देतोय आणि त्यांचीच बाजू ऐकून घेत आहे आणि मग त्यामुळे दुराव्याला सुरूवात होते. नवऱ्यापेक्षा बायकोचा नणंदेवरचा राग अधिक वाढतो आणि नणंदेला आपल्या भावातील हा बदल त्याच्या बायकोमुळे झाल्यासारखे वाटते.
हेदेखील वाचा – प्रेमविवाह असूनही का तुटते नाते, तज्ज्ञांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही विचार कराल
पालनपोषणातील फरक
नणंद आणि भावजय यांच्या पालनपोषणातील फरक हेदेखील भांडणांचं एक कारण असू शकते. पुष्कळ वेळा दोघींचाही जीवनाचा अनुभव, राहण्याची, बोलण्याची आणि वागण्याची पद्धत ही वेगळी असते. ज्यामुळे त्यांच्या मतांमध्ये मतभेद निर्माण होतात. परंपरा, नियम आणि घरातील कामांबाबत दोघांमध्ये मतभेद झाल्यास भांडणं वाढतात.
गैरसमजुती
गैरसमजुतीमुळे होतात भांडणं
घरातील छोट्या-छोट्या गोष्टींचे रूपांतर कधी कधी मोठ्या गैरसमजात होते. आपला आदर करत नाहीये असं वाटणं, एखाद्या लहानसहान गोष्टी मनात धरून ठेवणं, कोणत्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणं या गोष्टी वाढत जातात आणि नात्यातील गैरसमज वाढल्यामुळे भांडणं वाढतात. कधी कधी वेळीच गोष्टी न सोडविल्यास गुंतागुंत वाढताना दिसते.
कुटुंबाच्या अपेक्षा
नणंद आणि भावजय यांच्या नात्यात संघर्षाचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे कुटुंबाच्या अपेक्षा. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांवरून अनेक वेळा दोघांमध्ये वाद होऊ शकतो. वहिनीने नवीन घराचे नियम पाळणे अपेक्षित आहे. अशावेळी नणंदेला आणि भावजयीला घरातून वेगवेगळी वागणूक मिळते आणि त्याचे रूपांतर भांडणामध्ये आणि एकमेकांविषयी मनात राग निर्माण होण्यात होते.
आईची वागण्याची पद्धत
सासू करते अधिक मतभेद
पुष्कळ वेळा सासू तिच्या सुनेपेक्षा तिच्या मुलीवर अधिक विश्वास ठेवते आणि दोघींमध्ये सतत तुलना करत राहते. मुलीची अवाजवी स्तुती करणे आणि सुनेची अवाजवी टीका करणे यामुळे नणंद भावजयीत मत्सर निर्माण होणे साहजिक आहे. नणंद आणि भावजय या दोघींपुढेही परिस्थिती अशी निर्माण होते की एकमेकांना समजून घेणे कठीण होते.