ASCI Report
ग्रँड व्ह्यू रिसर्चनुसार, २०२५ मध्ये ३८.७७ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्य असलेली भारताची न्यूट्रास्युटिकल्स बाजारपेठ वाढती आरोग्यविषयक जागरूकता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या मागणीमुळे २०३३ पर्यंत १,१५१.५ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. फंक्शनल फूड्स, पेये आणि आहारातील सप्लिमेंट्स यांमध्ये ही श्रेणी विस्तारत आहे, तसतसे उत्पादनाच्या परिणामकारकतेबद्दल ग्राहकांचा दृष्टीकोन घडवण्यात जाहिरातींची भूमिका वाढताना दिसत आहे.
मूल्यांकन केलेल्या ६१ जाहिरातींपैकी एका केसवर सध्या प्रक्रिया सुरू आहे. ज्या ६० जाहिरातींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या सर्व जाहिराती एएससीआय संहितेचे उल्लंघन करणाऱ्या आढळल्या. यांपैकी २९ जाहिरातींवर संबंधित जाहिरातदारांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. ज्या ३१ जाहिरातदारांनी आक्षेपांना आव्हान दिले, त्यांना त्यांच्या जाहिरातींमधील दाव्यांसाठी पुरेसे पुरावे सादर करता आले नाहीत.
वजनावर नियंत्रण, अँटी-एजिंग, त्वचा उजळ करणे, यूव्ही संरक्षणात्मक उपाय आणि श्वसन आरोग्याशी संबंधित दाव्यांमध्ये प्रामुख्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. या अहवालात दमा, सीओपीडी, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि पीसीओएस यांसारख्या आजारांवर मात करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींमधील त्रुटींना देखील निदर्शनास आणण्यात आले आहे. दावा करत सांगितलेले परिणाम आणि दिशाभूल करणारी दृश्ये कशी अवास्तव अपेक्षा निर्माण करू शकतात, तसेच सामान्य वेलनेस सपोर्ट आणि वैद्यकीय उपचार यांमधील फरक कसा पुसट करू शकतात, याकडे अहवालाने लक्ष वेधले आहे.
अशा दाव्यांच्या उदाहरणांमध्ये “६० दिवसांत ६ किलो वजन कमी करा”, “१२ आठवड्यांत तुमच्या मांडीवरील चरबी नाहीशी होईल” आणि “यूव्ही हानीविरुद्ध त्वचेचे ३०० टक्के अधिक प्रबळ संरक्षण” यांसारख्या दाव्यांचा समावेश होता. अनेकदा, अंतिम उत्पादन जाहिरात केल्याप्रमाणे प्रत्यक्ष निकाल देते याचे कोणतेही ठोस पुरावे नसताना संपूर्ण उत्पादनाच्या पातळीवरील दाव्यांचे समर्थन करण्यासाठी केवळ त्यातील घटकांच्या पातळीवरील पुरावे वापरले गेले. तसेच, उत्पादनाशी संबंधित ठोस पुष्टीकरणाविना ‘आधी आणि नंतर’ तुलना दर्शवून जलद व दृश्यमान परिणामांचे दावे ठळक करण्यासाठी व्हिज्युअल्सचा अतिवापर करण्यात आला.
पुरेशा पुराव्यांविना केलेले दावे: जाहिरातदार तयार उत्पादन जाहिरात केलेले फायदे प्रत्यक्ष देऊ शकते, हे सिद्ध करणारे पुरेसे क्लिनिकल पुरावे किंवा स्वतंत्र चाचणी अहवाल सादर करण्यात अपयशी ठरले.
तुलनेच्या आधाराविना श्रेष्ठत्व सिद्ध करणे: “अधिक जलद” आणि “अधिक प्रभावी” यांसारख्या शब्दांमधून तुलनात्मक श्रेष्ठत्व सुचवले गेले, पण या तुलनेचा आधार नेहमी स्पष्ट किंवा सिद्ध केलेला नव्हता.
पुराव्यांपूर्वीच आश्वासने देणे: अनेकदा योग्य पुष्टीकरणाशिवाय जाहिरातींमधून फायद्यांचे दावे केले गेले. एएससीआयने आक्षेप घेतल्यानंतर जाहिरातदारांनी या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे देण्याऐवजी स्वतःहून त्यांच्या जाहिराती मागे घेणे किंवा त्यांमध्ये बदल करणे पसंत केले.
एएससीआयच्या सीईओ आणि सेक्रेटरी जनरल मनिषा कपूर म्हणाल्या, “ग्राहक अत्यंत विश्वासाने न्यूट्रास्युटिकल्सकडे वळतात, अनेकदा त्यांच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर थेट परिणाम करणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे हा यामागील हेतू असतो. जाहिरातींमध्ये जलद गतीने वजन कमी करण्याचे, वाढते वृद्धत्व रोखण्याचे किंवा विशिष्ट आजारांमधून आराम मिळवून देण्याचे आश्वासन दिले जाते, तेव्हा त्या दाव्यांचे समर्थन करणारे पुरावेही तितकेच प्रबळ असायला पाहिजे. एखाद्या घटकावर झालेल्या संशोधनाचा वापर अंतिम उत्पादनाची परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी आपोआप केला जाऊ शकत नाही. ही उत्पादन श्रेणी विस्तारत आहे, तसतसे जाहिरातींमधील दावे आणि उपलब्ध पुरावे यांमध्ये ताळमेळ असणे गरजेचे आहे, ज्यामुळे ग्राहक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील आणि पुराव्यांच्या पलीकडे जाऊन केलेल्या अवास्तव आश्वासनांमुळे त्यांचा विश्वास धोक्यात येणार नाही.”
या पुनरावलोकनाच्या माध्यमातून, एएससीआयने जबाबदार आरोग्य आणि वेलनेस जाहिरातींच्या महत्त्वाला पुन्हा निदर्शनास आणले आहे, जिथे केलेले दावे विश्वासार्ह पुराव्यांवर आधारलेले असावेत, तसेच शब्द, दृश्ये आणि आश्वासित परिणामांमधून निर्माण होणारा एकंदरीत प्रभाव दिशाभूल करणारा नसावा. जाहिरातदारांसाठी दाव्यांचे ठोस पुष्टीकरण केवळ एक कायदेशीर पूर्तता नसून ग्राहकांचे संरक्षण करणे आणि न्यूट्रास्युटिकल श्रेणीवरील विश्वास टिकवून ठेवणे यासाठी मूलभूत आधार आहे.
Ans: ASCI ही जाहिरातींच्या नियमांवर लक्ष ठेवणारी भारतीय संस्था आहे.
Ans: जीवनसत्त्वे, खनिजे आणि आरोग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पूरक उत्पादनांना न्यूट्रास्युटिकल्स म्हणतात.
Ans: या जाहिरातींमध्ये वजन कमी करणे, अँटी-एजिंग आणि त्वचा उजळवण्यासारख्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले. तसेच, जाहिरातविषयक नियमांचे उल्लंघन आढळले.






