Schools Digital Classrooms : नालासोपाऱ्यात शिक्षणाचा डिजिटल 'स्मार्ट' वर्ग! 41 जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलणार
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमधील विद्यार्थ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण ( Schools Digital Classrooms) घेता येणार आहे. भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या आमदार निधीतून या शाळांमध्ये डिजिटल वर्ग तयार करण्यात आले असून, गुरुवारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने आमदार राजन नाईक यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळा डिजिटल करण्याचा पुढाकार घेतला आहे.
विद्यार्थ्यांना शालेय वयातच डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्यापन अधिक प्रभावीपणे करता यावे, या उद्देशाने हे डिजिटल वर्ग तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या वेळी बोलताना आमदार राजन नाईक म्हणाले की, डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. तोपर्यंत या शाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.
भारताचे भविष्य घडविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ई-विद्या, वन क्लास वन चॅनल, डिजिटल लॅब आणि डिजिटल युनिव्हर्सिटी यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रगतीची दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आमदार निधीतून पुणे येथील सुपरमाइंड संस्थेकडे तीन वर्षांसाठी डिजिटल बोर्ड आणि इतर साहित्याच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित संस्थेकडून विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती भाजपचे महामंत्री मनोज बारोट यांनी दिली. तसेच याबाबत सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन विभागाचे अजय दळवी, सुपरमाइंड संस्थेच्या संचालिका अश्विनी भालेकर, समीर साळुंके, प्रकल्प प्रमुख शंतनू पवार, आशिष पाटील यांच्यासह केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका आणि शिक्षक उपस्थित होते. नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका रुचिता सूर्यवंशी यांनीही डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
Ans: नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील 41 जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल वर्ग तयार करण्यात आले आहेत.
Ans: भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या आमदार निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
Ans: डिजिटल बोर्ड आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी पद्धतीने शिकता येणार आहे. शिक्षकांनाही अध्यापन अधिक सोपे आणि आकर्षक करता येईल.






