त्वचेसाठी जास्वंदीच्या फुलाचे फायदे
गणपती बाप्पाच्या आवडीचे फुल म्हणजे जास्वंदी. जास्वंदीच्या फुलाचा वापर देवाची पूजा करण्यासाठी केला जातो. तसेच पूजेच्या प्रत्येक थाळीमध्ये जास्वंदीचे फुल हे असतेच. जास्वंदीच्या फुलाचा वापर जसा धार्मिक गोष्टींसाठी केला जातो तसाच वापर केस आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी सुद्धा केला जातो. जास्वंदीच्या फुलात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांची वाढ होऊन केसांची गुणवत्ता सुधारते. या फुलात प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह इतर पोषक घटक सुद्धा आढळून येतात. जास्वंदीच्या फुलामध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते, जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले जास्वंदीचे फुल चेहऱ्याचे हानिकारक बॅक्टरीयापासून रक्षण करते.
मागील अनेक वर्षांपासून जास्वंदीच्या फुलाचा वापर त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केला जात आहे. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरुम, पुटकुळ्या घालवण्यासाठी जास्वंदीचे फुल आणि पाने अतिशय प्रभावी आहेत. अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर त्याचे डाग तसेच राहून जातात. हे डाग घालवण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला जास्वंदीच्या फुलाचा वापर त्वचेसाठी कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लाल होते का?मग जळजळ कमी करण्यासाठी लावा ‘हे’ थंड पदार्थ
केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरून खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर केला जातो. जास्वंदीच्या फुलांमध्ये नॅचरल अॅसिड आढळून येते, ज्यामुळे त्वचेवरील काळे डाग निघून जातात. हे एक नैसर्गिक एक्सफोलिएशन असल्यामुळे त्वचेवर मुरूम, पिंपल्सचे डाग, फोड इत्यादी कमी होऊन त्वचा सुधारते. तसेच त्वचेचा काळा झालेला रंग सुधारण्यासाठी जास्वंदीचे फुल प्रभावी आहे. या फुलात अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचेच्या पेशींना रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी मदत होते. जास्वंदीच्या फुलात विटामिन सी जास्त असल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते.
त्वचेसाठी जास्वंदीच्या फुलाचे फायदे
चेहऱ्यासाठी जास्वंदीचे फुल वापरताना तुम्ही जास्वंदीच्या फुलात गुलाबपाणी मिक्स करून लावू शकता. हे पाणी त्वचेवर टोनर प्रमाणे वापरता येते. हा उपाय नियमित केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी होऊन त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल. उन्हामुळे टॅन झालेला शरीराचा रंग सुधारण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात जास्वंदीचे फुल टाकून काही वेळ उकळवून घ्या. त्यानंतर या पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेवरील टॅन निघून जाईल.
हे देखील वाचा: गणेशोत्सवात ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक, त्वचेवर येईल सुंदर चमक
त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी जास्वंदीच्या फुले आणि पानाची पेस्ट बनवून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये एक चमचा दही मिक्स करून फेसमास्क बनवा. त्यानंतर तयार केलेला मास्क संपूर्ण चेहऱ्याला लावून 15 मिनिटं कोरडा होण्यासाठी ठेवा. कोरडा झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमच्या त्वचेची चमक वाढेल. तसेच त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होईल.