स्तनपान आणि बाळाच्या प्रतिकारशक्तीचा काय संबंध (फोटो सौजन्य - iStock)
Breastfeeding Week: योग्य पद्धतीने स्तनपान कसे कराल?
आईच्या दुधात नेमके काय असते?
आईचे दूध हे केवळ पोषणाचे माध्यम नाही. त्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन, रोगप्रतिकारक पेशी, एन्झाईम्स आणि प्रोबायोटिक्सचे एक गुंतागुंतीचे मिश्रण असते, जे नवजात बाळाचे शरीर जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत स्वतः तयार करू शकत नाही. यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘सिक्रेटरी इम्युनोग्लोब्युलिन ए’ (sIgA). हे एक प्रकारचे अँटीबॉडी आहे जे बाळाच्या आतड्यांवर आणि श्वसननलिकेवर एक सुरक्षित कवच तयार करते; ज्यामुळे जंतूंचा शरीरात प्रवेश रोखला जातो. आई जेव्हा तिच्या सभोवतालच्या वातावरणातील जंतूंच्या संपर्कात येते, तेव्हा तिची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःहून अशा अँटीबॉडीज तयार करते, ज्या बाळाचे त्याच जीवाणूंपासून रक्षण करतात.
याशिवाय, आईच्या दुधात पांढऱ्या पेशी, लॅक्टोफेरिन (जे जीवाणूंशी लढते) आणि ऑलिगोसॅकराइड्स असतात. ऑलिगोसॅकराइड्स ही एक प्रकारची क्लिष्ट साखर आहे, जी बाळ पचवू शकत नाही; पण ती बाळाच्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवण्यास मदत करते. हे सर्व घटक मिळून बाळाचे ‘मायक्रोबायोम’ म्हणजेच पोटातील आरोग्य उत्तम ठेवतात, जे वाढत्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
संशोधन काय सांगते?
अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की, स्तनपानामुळे बाळाला सुरुवातीच्या काळात होणाऱ्या जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो. श्वसनाचे त्रास, पोटाचे विकार आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांमधील आतड्यांचे गंभीर आजार रोखले जाऊ शकतात. जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात, फॉर्म्युला मिल्क पिणाऱ्या बाळांपेक्षा स्तनपान करणाऱ्या बाळांना दवाखान्यात नेण्याची गरज खूप कमी पडते.
स्तनपानाचे दीर्घकालीन फायदेही सांगितले जातात, जसे की दमा, ॲलर्जी, लठ्ठपणा आणि टाईप १ मधुमेह यांचा धोका कमी होणे, पण याचे पुरावे थोडे कमी आहेत आणि इतर कारणांमुळे यात फरक पडू शकतो. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही दिवसांत येणाऱ्या घट्ट, पिवळसर दुधामध्ये अँटीबॉडीज भरपूर असतात. म्हणूनच, त्याला बाळाची ‘पहिली लस’ म्हटले जाते, जे अगदी योग्य आहे.
काही महत्त्वाच्या गोष्टी
स्तनपानामुळे बाळाला उत्तम रोगप्रतिकारक शक्ती मिळते, हे नक्की. पण याचा अर्थ असा नाही की बाळ कधीच आजारी पडणार नाही. स्तनपान करणाऱ्या बाळांनाही सर्दी किंवा इतर सामान्य आजार होऊ शकतात. फरक एवढाच आहे की, त्यांना हे आजार इतरांपेक्षा कमी वेळा आणि अगदी सौम्य प्रमाणात होतात. स्तनपानाचे रोगप्रतिकारक शक्तीसंदर्भातील हे फायदे बहुतांश तात्पुरते असतात आणि जसजसे बाळ मोठे होते, तसतसा हा प्रभाव कमी होत जातो.
आता फॉर्म्युला मिल्क पिणाऱ्या बाळांबाबत काय होते ते पाहू या. आजकालच्या फॉर्म्युला मिल्कमध्ये बाळाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसेच, बाळ जसजसे मोठे होते, सभोवतालच्या जंतूंच्या संपर्कात येते आणि त्याचे लसीकरण होते, तसतशी त्याची स्वतःची रोगप्रतिकारक शक्तीही तयार होऊ लागते. याशिवाय पुरेशी झोप, योग्य पोषण, आजूबाजूचे वातावरण आणि आनुवंशिकता यासारख्या इतरही अनेक गोष्टींचा प्रभाव बाळाच्या आरोग्यावर पडत असतो.
खरंच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते का?
स्तनपानामुळे बाळाला उत्तम रोगप्रतिकारक शक्ती मिळते, यात शंकाच नाही. विशेषतः जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात अनेक सामान्य जंतुसंसर्गापासून बाळाचे रक्षण करण्यासाठी याची मोठी मदत होते. आईच्या दुधातील अँटीबॉडीज, रोगप्रतिकारक पेशी आणि इतर घटक बाळाच्या पोटाचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात. पण, सशक्त रोगप्रतिकारक शक्तीसाठी केवळ स्तनपान हाच एकमेव घटक नाही; प्रत्येक बाळाच्या शरीरात याची कमतरता भरून काढणारे इतरही अनेक सकारात्मक घटक असतात.
जर तुम्ही काही अपरिहार्यता, स्वतः ठरवून किंवा परिस्थितीमुळे स्तनपान करू शकत नसाल, तर चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. फॉर्म्युला मिल्क पिणारी बाळेसुद्धा स्तनपान करणाऱ्या बाळांइतकीच उत्तम रीतीने वाढू शकतात. बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही केवळ स्तनपानावर अवलंबून नसून, ती एकमेकांशी जोडलेल्या अनेक घटकांमुळे विकसित होत असते.






