Breastfeeding: पूर्वीच्या तुलनेत आता स्तनपान अधिक आव्हानात्मक का वाटतेय? ‘या’ कारणांमुळे वाढू शकतात अडचणी
मुंबई: जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफच्या शिफारसीनुसार, बाळाला जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देणे महत्त्वाचे आहे. मात्र, बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, अपुरी झोप, प्रसूतीनंतर लवकर कामावर रुजू होण्याची गरज, विभक्त कुटुंबपद्धती, सोशल मीडियावरील चुकीची माहिती आणि कुटुंबीयांकडून पुरेसा आधार न मिळणे यामुळे अनेक नवमातांसाठी स्तनपानाचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक ठरत आहे. याविषयी डॉ. अमित पी. घावडे, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
स्तनपान ही केवळ बाळाला पोषण देण्याची प्रक्रिया नसून आई आणि बाळाच्या आरोग्याशी जोडलेला महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक मातांना दूध कमी येत असल्याचा गैरसमज होतो, तर काही वेळा बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान करवता येत नाही. स्तनांमध्ये वेदना, स्तनाग्रांना होणारी जखम किंवा दुखणे, योग्य स्तनपान तंत्राची माहिती नसणे आणि मानसिक ताण यामुळेही अडचणी निर्माण होऊ शकतात. योग्य वेळी मार्गदर्शन न मिळाल्यास काही माता काही आठवड्यांतच स्तनपान थांबवण्याचा निर्णय घेतात.
आजच्या काळात सोशल मीडियामुळे नवमातांकडे माहितीच्या अनेक स्रोत उपलब्ध आहेत. मात्र, सोशल मीडियावर मिळणारी प्रत्येक माहिती योग्य किंवा वैज्ञानिक असेलच असे नाही. इतर मातांशी तुलना, अवास्तव अपेक्षा आणि चुकीचे सल्ले यामुळे अनेक मातांचा आत्मविश्वास कमी होतो. प्रत्यक्षात स्तनपानातील अनेक अडचणी योग्य मार्गदर्शन आणि सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या मदतीमुळे सहज दूर करता येतात. त्यामुळे आईने समस्या मनात न ठेवता डॉक्टर किंवा स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.”
डॉक्टरांच्या मते, नवमातांनी स्तनपान करताना वेदना, बाळाला दूध पिण्यात अडचण, बाळाचे वजन अपेक्षेप्रमाणे न वाढणे किंवा दूध कमी येत असल्याची चिंता जाणवल्यास स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी मिळणारे मार्गदर्शन, कुटुंबाचा आधार आणि आईचा आत्मविश्वास हे यशस्वी स्तनपानासाठी महत्त्वाचे घटक आहेत.
Ans: बदलती जीवनशैली, झोपेचा अभाव, कामाचा ताण, प्रसूतीनंतरचा शारीरिक-मानसिक ताण आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे काही मातांना स्तनपान अधिक आव्हानात्मक वाटू शकते.
Ans: बाळाला योग्य पद्धतीने स्तनाला न लागणे, स्तनाग्रांमध्ये वेदना, दूध कमी असल्याची चिंता, स्तनांमध्ये ताण किंवा दूध साचणे आणि बाळाच्या फीडिंग पॅटर्नशी जुळवून घेण्यास होणारी अडचण अशा समस्या येऊ शकतात.
Ans: ताण आणि थकवा आईच्या स्तनपानाच्या अनुभवावर परिणाम करू शकतात. त्यामुळे पुरेशी विश्रांती, आधार आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.






