आचार्य चाणक्यंनी नितीशास्त्राविषयी खूप लिहिलं आहे. त्यांचे सिद्धांत आजही जीवनात तंतोतंत लागू होतात. त्यामध्ये मालमत्ता, मित्र, करिअर, महिला, वैवाहिक जीवन अशा मानवी जीवनातल्या महत्त्वाच्या जवळपास सर्वच गोष्टींची सखोल माहिती दिली आहे. त्यांनी युवकांसाठीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी युवकांनी कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात, काय करावं हे चाणक्यांनी सांगितलं आहे.
सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेत चाणक्य महामंत्री होते. त्यांनी लिहिलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतला एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात २५ प्रकरणं आणि ६ हजार श्लोक आहेत. राजकारण आणि अर्थशास्त्रावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात सांगितलेली नीती चाणक्यनीती म्हणून ओळखली जाते. माणसानं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कसं वागावं, कसं जगावं याची उत्तरं चाणक्यनीतीमध्ये सापडतात.
आचार्य चाणक्य सांगतात, की नशेचं व्यसन युवकांना आयुष्यातून उठवतं. युवावस्थेत नशेचं व्यसन लागलं, तर माणसाचं करिअर, आरोग्य, कौटुंबिक जीवन, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींचं नुकसान होतं. तो नैराश्याच्या गर्तेत सापडतो. त्यानंतर इच्छा असूनही त्याचं आयुष्य पुन्हा रुळावर येऊ शकत नाही. त्यांचं भरून न निघणारं नुकसान होतं.
युवावस्था हा माणसाच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात युवकांनी स्वतःमध्ये असलेली हुशारी, कौशल्यं शोधावीत आणि समजून घ्यावीत. या हुशारीचा वापर पूर्ण शक्तीनं योग्य दिशेने करावा. तसं केल्यास युवक काहीही मिळवू शकतात. एवढंच नव्हे, या काळात त्यांनी कोणतंही ध्येय ठरवलं तर ते साधण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. कारण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसा वेळ, शक्ती आणि आरोग्य या तिन्ही गोष्टी असतात. परंतु या काळात त्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवला तर त्यांच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय राहात नाही. त्यामुळे अशा गोष्टींपासून त्यांनी नेहमी दूर राहिलं पाहिजे.
एखादा माणूस किती संस्कारी, गुणसंपन्न, मेहनती, बुद्धिमान का असेना, पण त्याला वाईट संगत मिळाली तर त्याच्या आयुष्याचं नुकसान होणं निश्चित आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तो मोठ्या संकटात सापडू शकतो आणि आपलं भविष्य गमावू शकतो. त्यामुळे सुसंगती मिळवावी आणि राखावी.
आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं उगीच कोणी बोलत नाही. तो खरंच शत्रूच असतो. आळशी माणूस आपल्या आयुष्यात कधीही काहीही मिळवू शकत नाही. युवावस्थेत आळशीपणानं घेरलं, तर त्यानं आयुष्यातला सर्वांत अमूल्य वेळ गमावलेला असतो. युवकांनी आपल्या जीवनातल्या सर्वाधिक ऊर्जावान वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करावा.