प्रोस्टेट कॅन्सर (फोटो सौजन्य - iStock)
प्रोस्टेट कर्करोग हा केवळ वृद्धापकाळात होणारा आजार नाही. सध्या, ६५ वर्षांवरील नाही तर, चाळीशीतील पुरुषांना देखील प्रोस्टेट कर्करोगाचे निदान होत आहे. पुरुष आरोग्य सप्ताहानिमित्त डॉ. गौरव जसवाल एमडी,रेडिएशन ऑन्कोलॉजी, डायरेक्टर रेडिएशन ऑन्कोलॉजी, ऑन्को-लाइफकेअर कॅन्सर सेंटर, चिपळूण यांनी सांगितले की, वेळीच निदान आणि उपचार केल्यास या कर्करोगावर मात करता येऊ शकते.
प्रोस्टेट कॅन्सर ओळखण्याकरिता प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन [ PSA] ही एक रक्ताची चाचणी आहे. यामध्ये पीएसएची पातळी मोजली जाते आणि त्याची प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता लवकर समजण्यास मदत होऊ शकते. डिजिटल रेक्टल परीक्षणाद्वारे (DRE) त्वरीत निदान करता येते.
दरवर्षी वाढतोय Prostate Cancer
प्रोस्टेट कॅन्सरमध्ये वाढ (फोटो सौजन्य – iStock)
जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीमधील पेशी अनियंत्रितरित्या वाढतात तेव्हा हा कॅन्सर तयार होतो. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झालेल्या पुरुषांची संख्या 2040 पर्यंत दुप्पट होईल असा अंदाज आहे. हा डेटा सूचित करतो की वार्षिक प्रोस्टेट प्रकरणे 2020 मध्ये 1.4 दशलक्ष वरून 2040 मध्ये 2.9 दशलक्ष पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. भारतात दरवर्षी अंदाजे 33,000 ते 42,000 नवीन प्रकरणाची नोंद होते. याकरिता वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक असून नियमित तपासणी आणि त्वरीत उपचारांची आवश्यकता आहे.
त्वरीत लक्ष देण्याची गरज
ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हृदयाची, फुफ्फुसाची, यकृताची आणि मूत्रपिंडाच्या आरोग्याची काळजी घेते, त्याचप्रमाणे प्रोस्टेटच्या बाबतीतही त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. हा 65 वर्षाहून अधिक वयाच्या वयस्कर पुरुषांमधील आजार मानला जात असला तरी आता मात्र ही परिस्थिती बदलली असून 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुण पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
काय आहे कारण?
प्रोस्टेट कॅन्सर होण्याची कारणे (फोटो सौजन्य – iStock)
अनुवांशिकता, वैद्यकीय इतिहास, वाढते वय, धुम्रपानाच्या सवयी, आहाराच्या चूकीच्या सवयी आदी घटक प्रोस्टेट कर्करोगास कारणीभूत ठरत आहेत. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि हानिकारक रसायनांचा संपर्क हे देखील प्रोस्टेट कर्करोगास कारणीभूत ठरत आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात, काही व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याची माहिती डॉ. गौरव जसवाल, एमडी,रेडिएशन ऑन्कोलॉजी, डायरेक्टर रेडिएशन ऑन्कोलॉजी, ऑन्को-लाइफकेअर कॅन्सर सेंटर, चिपळूण यांनी दिली.
काय आहे प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे
जसजसा कर्करोग वाढत जातो, तसतसे पुरुषांना ओटीपोटापासून खालील भागात अस्वस्थता जाणवणे, लघवी करताना अडचणी येतात जसे की वेदना किंवा जळजळ होणे किंवा लघवीचा प्रवाह कमी होणे, लघवीवाटे रक्त येणे (हेमॅटुरिया) आणि हाडांमध्ये वेदना यासारखी लक्षणे दिसून येतात. रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी या लक्षणांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.
दर महिन्याला ओपीडीमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे ३-४ रुग्ण आढळून येतात. प्रोस्टेट कर्करोगाचे वेळीच निदान झाल्याने रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. रक्तातील पीएसए [ PSA] पातळीसारखी चाचणी तसेच डिजिटल रेक्टल तपासणी (DRE) करणे आवश्यक आहे.
कोणत्या थेरपी कराव्या?
प्रोस्टेट कॅन्सर थेरपी (फोटो सौजन्य – iStock)
प्रोस्टेट कॅन्सरला तोंड देण्याच्या आव्हानांसाठी रेडिएशन, शस्त्रक्रिया, हार्मोन थेरपी किंवा केमोथेरपीचा समावेश असलेल्या बहु-अनुशासनात्मक पद्धतींची आवश्यकता भासते आणि मुख्यत्वे ग्रामीण भागात हा रोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचेही डॉ. जसवाल यांनी स्पष्ट केले.