हातापायांमध्ये कायमच झिणझिण्या येतात? हात पाय सुन्न होऊन जातात? शरीरसंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका
हातापायांमध्ये झिणझिण्या का येतात?
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे हात सुन्न पडतात?
रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यास उद्भवणाऱ्या समस्या?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचे कमी सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा हातापायांमधून झिणझिण्या येतात तर काहीवेळा शरीर सुन्न झाल्यासारखे वाटते. ही समस्या सामान्य वाटत असली तरी सुद्धा शरीरसंबंधित गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. ही समस्या कायमच झोपल्यानंतर किंवा अंथरुणावर पडून राहिल्यानंतर उद्भवते. वारंवार उद्भवणाऱ्या समस्येकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता शरीरसंबंधित समस्यांचे वेळीच निदान करणे फार आवश्यक आहे. अन्यथा छोटे वाटणारे आजार जीवावर बेतू शकतात. हातामध्ये झिणझिण्या किंवा शरीरात सुन्नपणा चुकीच्या पोजिशनमध्ये झोपल्याने किंवा जास्त वेळ एकाच स्थितीमध्ये राहिल्यामुळे उद्भवते.(फोटो सौजन्य – istock)
हृदयविकार आता फक्त वृद्धांपुरता मर्यादित नाही, तज्ञांनी दिला गंभीर इशारा
जास्त वेळ एकाच स्थितीमध्ये राहिल्यामुळे नसांवर जास्तीचा दबाव येतो आणि शरीराला आवश्यक रक्तपुरवठा होत नाही. शरीराचा रक्तपुरवठा काही वेळासाठी खंडित झाल्यामुळे हातांमध्ये सुन्नपणा जाणवणे किंवा हातापायांमध्ये वेदना वाढू लागतात. तसेच हातापायांमध्ये झिणझिण्या येण्यामागे इतरही कारणे असू शकतात. हातापायांमध्ये नेहमीच झिणझिण्या येत असतील तर ही सामान्य समस्या नाही. कार्पल टनल सिंड्रोम, मनगटाची नस दबणे किंवा बोटांमध्ये सतत झिणझिण्या येत असतील तर हाताचा कोपरा किंवा मानेसंबंधित समस्या असू शकतात. नसांवर कुठेही दाब आल्यानंतर हातांमध्ये झिणझिण्या येतात.
हातापायांमध्ये झिणझिण्या येण्याचे प्रमुख कारण म्हणजे रक्तभिसरणात अडथळे निर्माण होणे. थंडीत तापमानात होणाऱ्या बदलांमुळे बोटे सुन्न होऊन त्यांचा रंग सुद्धा बदलू शकतो. वारंवार या समस्येकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. तसेच मधुमेह झाल्यानंतर नसांवर गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरातील नसा कमजोर झाल्यामुळे हात – पायांना झिणझिण्या, जळजळ किंवा सुन्नपणा जाणवतो. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात वारंवार झिणझिण्या जाणवत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर हातापायांमध्ये झिणझिण्या येतात. तर शरीरात कायमच थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. तर काहीवेळा थायरॉईड झाल्यानंतर सुद्धा हातापायांमध्ये झिणझिण्या येतात. मेटाबॉलिज्म बिघडल्याने नसांवर प्रभाव पडतो आणि आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात.
खांदे किंवा मानेच्या रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर हाताना झिणझिण्या येऊ शकतात. झिणझिण्यासोबत कमजोरी, वेदना जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. हातापायांमध्ये सुन्नपणा, बोलताना अडचण निर्माण होणे, चक्कर येणे ही स्ट्रोक संबंधित लक्षणे असतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.






