गॅस्ट्रो, मलेरियासह मुंबईमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
पावसाळा सुरु झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर सगळीकडे रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढते. तसेच डेंग्यू, मलेरिया, गेस्ट्रो हे आजार देखील वाढू लागतात. या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य पूर्णपणे बिघडण्याची शक्यता असते. मुंबईमध्ये मलेरियाचे 80 टक्के रुग्ण आहेत तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गॅस्ट्रोसारख्या गंभीर आजाराचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या हंगामात आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात. या आजारांमुळे शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.(फोटो सौजन्य-istock)
बीएमसीकडून सांगण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये मलेरियाचे 443 आणि डेंग्यूचे 93 रुग्ण आढळून आले होते. तर जुलैमध्ये मलेरियाचे 797 , डेंग्यूचे 535 आणि चिकुनगुनियाचे 25 रुग्ण आढळून आले होते. तसेच आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे बीएमसीकडून चिंता व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात 5 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. प्रीतित समदानी म्हणाले, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यातील 80 टक्के रुग्ण हे उपचार घेऊन पुन्हा घरी निघून जातात, तर 20 टक्के रुग्णांना आधीच कोणता ना कोणता आजार झालेला असतो.
हे देखील वाचा: पावसाळी किड्यांची करा हकालपट्टी, 5 सोप्या उपायांचा करा वापर
सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक व औषध विभागाचे युनिट प्रमुख डॉ.विनायक सावर्डेकर म्हणाले, मुंबईसह राज्यभरात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डेंग्यू झालेले रुग्ण ओपीडीमधून उपचार घेऊन घरी पुन्हा जातात. पण डेंग्यूमुळे ज्या रुग्णांच्या पेशी १ लाखापेक्षा कमी झाल्या आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. तसेच मलेरिया झालेल्या 70 ते 80 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. मलेरिया झाल्यानंतर फाल्सीपेरमचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहचल्यानंतर रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.
बीएमसीने सांगितल्यानुसार, दूषित अन्नपदार्थ पोटात गेल्यानंतर गॅस्ट्रो होण्याची शक्यता असते. जूनमध्ये गॅस्ट्रोचे 722 रुग्ण तर हिपॅटायटीसचे 99 रुग्ण आढळून आले आहेत. हाच आकडा जुलै महिन्यात 1239 वर झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यभरात सगळीकडे वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.