फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला बहुतांश वेळ स्क्रीनसमोर जातो. सोशल मीडिया, गेम्स, चॅटिंग आणि व्हिडिओ पाहण्याच्या सवयीमुळे तासन्तास फोन वापरण्याची सवय लागते. दिवसभर फोन वापरल्यानंतर डोकं जड होतं, थकवा जाणवतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. सतत फोनमध्ये गुंतून राहिल्याने कोणकोणते धोके संभवतात, ते जाणून घेऊया.
अति प्रमाणात फोन वापरणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. Stanford Center on Longevity च्या अहवालानुसार, जास्त फोन वापरण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो, मानेदुखीचा त्रास होतो, मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो आणि सामाजिकदृष्ट्या एकलकोंडे होण्याचा धोका वाढतो. जर सकाळी उठल्यावर लगेचच तासभर फोन स्क्रोल करत बसाल, तर तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
या अहवालानुसार, लोक जसा जास्त वेळ फोनवर घालवतात, तसा त्याचा परिणाम शिकण्याच्या क्षमतेवर होतो. स्मरणशक्ती कमी होते आणि न्यूरोडीजेनेरेशनचा धोका वाढतो. १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये सतत स्क्रीनकडे बघत राहिल्याने मेंदूच्या बाहेरील थर सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होतो. हा थर स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचा असतो. सतत फोन वापरण्यामुळे एकाग्रता कमी होते आणि झोपेवरही परिणाम होतो, ज्यामुळे तणाव आणि चिंतेची पातळी वाढते.
सतत फोनच्या अधीन राहण्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे फोनचा मर्यादित वापर करणे गरजेचे आहे. यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. सर्वप्रथम, फोन किती वेळ वापरतोय याची नोंद ठेवण्यासाठी स्क्रीन टाइम सेटिंग किंवा एखाद्या अॅपचा वापर करावा. त्यानुसार, ठराविक वेळ निश्चित करावा, विशेषतः सकाळी आणि रात्री फोनच्या वापरावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया आणि गेमिंग अॅप्ससाठी वेळेची मर्यादा सेट करावी, जेणेकरून अनावश्यक स्क्रोलिंग टाळता येईल. बिनकामाचा फोन वापर रोखण्यासाठी “Do Not Disturb” मोड सुरू ठेवावा. झोपण्याच्या किमान एक तास आधी फोन बाजूला ठेवण्याची सवय लावावी आणि जेवताना किंवा अभ्यास करताना फोनपासून दूर राहावे. मोकळ्या वेळात फिरायला जाणे, योग-व्यायाम करणे किंवा नवीन छंद जोपासणे जसे की वाचन, चित्रकला किंवा संगीत ऐकणे हे चांगले पर्याय आहेत. याशिवाय, मित्र आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्यास फोनपासून काही काळ सुटका मिळेल. आठवड्यातून किमान एक दिवस “फोन-फ्री डे” ठेवावा आणि सोशल मीडिया ब्रेक घ्यावा. या उपायांमुळे फोनवरील अवलंबित्व कमी होईल आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.