फुफ्फुसाचा कर्करोग
1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुसांचा कॅन्सर दिवस म्हणून पाळला जातो. सर्वाधिक जीवघेण्या असलेल्या फुफ्फुसांच्या कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण केली जावी हा यामागचा उद्देश आहे. आधीच्या काळात हा कॅन्सर वयस्क व्यक्तींमध्ये सर्वात जास्त आढळून यायचा, पण आता युवा व्यक्तींचे या आजाराला बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
अयोग्य जीवनशैली आणि पर्यावरणातून होणारे दुष्परिणाम ही यामागची प्रमुख कारणे आहेत. फुफ्फुसांचा कॅन्सर लवकरात लवकर लक्षात येणे गरजेचे आहे आणि हा आजार टाळला जाण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे देखील महत्त्वाचे आहे. डॉ. विनोद चव्हाण, कन्सल्टन्ट, चेस्ट फिजिशियन आणि पलमोनोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. तरुण वयातील व्यक्तींमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरचे सुरुवातीचे टप्पे आपण जाणून घेऊ. (फोटो सौजन्य – iStock)
सतत येणारा खोकला आणि खोकल्यातून रक्त
सतत खोकला येत असल्यास
कमी न होणारा किंवा अधिकाधिक गंभीर होत चाललेला खोकला हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून खोकला येत असेल, तर तातडीने डॉक्टरांना दाखवा. खोकल्यामधून अगदी थोड्या प्रमाणात का होईना, पण रक्त येणे हे एक गंभीर लक्षण आहे. अशावेळी तातडीने मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना दाखवावे.
छातीमध्ये वेदना
छाती, खांदे किंवा पाठीमध्ये अस्वस्थता, दुखणे जे कमी होत नसेल आणि दीर्घ श्वास घेताना, खोकताना किंवा हसताना वाढत असेल तर ते फुफ्फुसांच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. त्यामुळे या लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते.
हेदेखील वाचा – Lung Cancer: धुम्रपान न करण्यांनाही होतोय फुफ्फुसाचा कर्करोग, स्टडीतून खुलासा
श्वास घेताना त्रास
श्वास कमी पडणे किंवा घरघर लागणे, खासकरून जर हे अचानक होत असेल आणि त्याचे कोणतेही विशेष कारण नसेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे. श्वास घेताना होणारा त्रास हा कॅन्सरच्या कारणामुळेही असू शकतो हे लक्षात घ्या.
वजन कमी होणे
अचानक वजन कमी झाल्यास
कोणतेही विशेष कारण नसताना वजन कमी होत असल्यास ते फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे होत असल्याची शक्यता असते. जर तुम्ही कोणतेही प्रयत्न न करता, वजन कमी होत असेल तर आजाराच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे शरीर जास्त ऊर्जा वापरत असल्याने तसे होत असल्याची शक्यता असते.
थकवा आणि आवाज
अचानक खूप थकवा येणे किंवा कमजोरी जाणवणे हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे एक सामान्य लक्षण आहे. कॅन्सरच्या पेशी शरीरातील सर्व ऊर्जा वापरतात आणि त्यामुळे थकवा येतो. त्याचप्रमाणे आवाजात बदल होऊन तो कर्कश झाला आणि ही स्थिती दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळपर्यंत राहिली तर हे फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे होत असल्याची शक्यता असते. फुफ्फुसांचा कॅन्सर स्वरतंतूंवर परिणाम करू शकतो.
सातत्याने संसर्ग होणे
दमा किंवा न्यूमोनिया यासारखे श्वासाचे संसर्ग सतत होत असतील तर हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे एक लक्षण असू शकते. हे ट्यूमर वायू मार्गामध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे संसर्ग निर्माण होण्यास, वाढण्यास अनुकूल वातावरण तयार होते.
हेदेखील वाचा – फक्त प्रदूषण किंवा सिगरेट नाही, तर ‘या’ गोष्टींमुळे सुद्धा होऊ शकतो Lung Cancer
धुम्रपान करू नये आणि अल्कोहोल नियंत्रणात
स्मोकिंग करणे टाळा
धुम्रपानामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. धूम्रपान टाळा आणि जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते बंद करण्यासाठी मदत घ्या. पॅसिव्ह स्मोकिंग अर्थात तुम्ही स्वतः जरी धूम्रपान करत नसाल तरी तुमच्या जवळपास धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या बिडी, सिगारेट किंवा तत्सम धुम्रपानातून निघणाऱ्या धुरामुळे देखील फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.
अल्कोहोलचे सेवन नियंत्रणात राहू द्या: कमी प्या – जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने काही प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. अल्कोहोलचे सेवन नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करा.
आरोग्याला हितकारक आहार
नियमित योग्य आहार निवडा
फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये यांचा समावेश असलेला संतुलित आहार नियमितपणे घ्यावा. स्वतःच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राखा, यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी करता येतो. या अन्नपदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स व पोषके असतात जी पेशींचे संरक्षण करतात व त्यांचे नुकसान होण्यापासून रोखतात.
पर्यावरणातील विषारी पदार्थ टाळा: एस्बेस्टोस, रेडॉन आणि इतर वायु प्रदूषके टाळा; हे फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. तुमची राहती व कामाची जागा हवेशीर राहील याची काळजी घ्या.
नियमित व्यायाम
नियमित व्यायाम करणे आवश्यक
शरीर सक्रिय असेल तर वजन नियंत्रणात राहते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते आणि कॅन्सर टाळता येतो. त्यामुळे नियमित व्यायाम करत राहावा. खाऊन लगेच कामाला लागू नका अथवा खाल्ल्यावर लगेच झोपत असाल तर अशा सवयी वेळीच बंद करा.
नियमितपणे तपासणी करून घ्या
ज्यांना कॅन्सरचा सर्वाधिक धोका आहे तसेच ज्यांच्या कुटुंबात याआधी इतर कोणाला कॅन्सर झालेला आहे, जे दीर्घकाळपर्यंत कार्सिनोजेनच्या संपर्कात आले आहेत, अशा व्यक्तींनी नियमितपणे तपासणी करून घ्यावी. कमी-डोस सीटी स्कॅनसह, नियमित तपासणीतून आजार लवकर ओळखला जाऊ शकतो.
लसीकरण
कर्करोगासाठी लसीकरण
सर्व लसीकरणे करून घ्या, विशेषत: फ्लू आणि न्यूमोकोकल लस घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे फुफ्फुसे कमकुवत करणारे श्वासाचे संसर्ग टाळता येतात. फुफ्फुसांचा कॅन्सर टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या शिफारसी तसेच यासंदर्भात केल्या गेलेल्या संशोधनाचे निष्कर्ष यांची माहिती घेत राहा. तुम्ही जितके जास्त जागरूक व जाणकार बनाल, तितके जास्त निरोगी राहाल.
निष्कर्ष
फुफ्फुसांच्या कॅन्सरविरोधात लढा यशस्वी होण्यासाठी आजार लवकरात लवकर लक्षात येणे आणि आजार टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक लक्षणे ओळखता आल्यास, निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास आजाराचा धोका कमी होतो. अशाप्रकारे आपण या जीवघेण्या आजाराचे प्रमाण खूप कमी करू शकतो.