सर्व्हायकल कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कशी ओळखावी
सर्व्हायकल कॅन्सर हा आपल्या देशात सर्वाधिक प्रमाणात सापडणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. सर्व्हायकल कॅन्सरचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत असले, तरीही त्याचा अर्थ आता आपण त्याबद्दल जागरुक राहण्याची गरज संपली आहे असा होत नाही.
सर्व्हायकल कॅन्सरच्या काही सर्वाधिक महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे दोन मासिक पाळ्यांच्या दरम्यानच्या काळात, पाळी संपून अनेक दिवस होऊन गेल्यानंतरही आणि लैंगिक क्रियेनंतर होणारा रक्तस्त्राव. तुम्हाला ही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टराचा सल्ला घ्या. तज्ज्ञ डॉ. शिशिर एन. शेट्टी, सीनिअर कन्सल्टन्ट – सर्जिकल ऑन्कोलॉजी, फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
एखादी व्यक्ती अनेकांशी अनौपचारिक लैंगिक संबंध ठेवत असेल तर तिने पॅप स्मिअर चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे, कारण सर्व्हायकल कॅन्सरचे हे सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे कारण आहे. १६ वर्षांखालील मुलींचे लसीकरण करण्याचा सल्ला आम्ही देतो, कारण सर्व्हायकल कॅन्सर हा ह्युमन पापिलोमा व्हायरस (HPV)मुळे होऊ शकतो व हा विषाणू लैंगिक संबंधांतून संक्रमित होतो व लसीकरणाद्वारे असे संक्रमण रोखता येऊ शकते.
सर्व्हायकल कॅन्सरचे कोणते संकेत ओळखावे जाणून घ्या
काय आहेत लक्षणे
या आजाराची रक्तस्त्रावाखेरीज इतर विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, रक्तस्त्राव हा वयोवृद्ध स्त्रियांच्या तुलनेत विशेषत्वाने रजोनिवृत्तीपूर्व काळातील महिला किंवा अधिक तरुण लोकसंख्यागटातील महिलांसाठी चिंतेची प्रमुख बाब आहे. वाढत्या वयाबरोबर सर्व्हायकल कॅन्सरचा धोका कमी होत जातो मात्र पूर्णपणे नाहिसा होत नाही. म्हणूनच कोणत्याही प्रकारे अनपेक्षित स्पॉटिंग झाल्यास किंवा रक्तस्त्राव झाल्यास नेहमीच त्याची आरोग्यसेवा व्यवसायातील तज्ज्ञांकडून तपासणी झाली पाहिजे
तज्ज्ञांचे काय आहे म्हणणे
गर्भाशयाचा कर्करोग अनेकदा शांतपणे विकसित होतो, त्यामुळे महिलांनी त्याची सुरुवातीची लक्षणे लक्षात घेऊन आणि वेळीच वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते. मासिक पाळी दरम्यान, संभोगानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव यासारखे योनीतून होणारे असामान्य रक्तस्त्राव हे सुरुवातीच्या सामान्य लक्षणांपैकी एक लक्षण आहे असे न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी सांगितले.
इतर लक्षणांमध्ये योनीतून होणारा, पाण्यासारखा, रक्ताळलेला किंवा दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव, ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता असू शकते. संभोगा दरम्यान वेदना आणि सतत पाठ, ओटीपोट किंवा पाय दुखणे हे देखील गर्भाशयाच्या मुखाच्या प्रगत समस्या असल्याचे संकेत आहेत.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढत असताना, लघवी करण्यास त्रास होणे, मलविसर्जनातील अनियमितता किंवा पायांवरील सूज यासारखी लक्षणे दिसू शकतात.
जरी ही चिन्हे इतर आजारांशी संबंधित असली तरी त्याकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर आजारांचे निदान आणि उपचार यांसाठी विलंब होऊ शकतो. लवकर निदानासाठी नियमित पॅप स्मीअर आणि एचपीव्ही चाचण्या आवश्यक आहेत, विशेषतः एचपीव्ही संसर्ग किंवा धूम्रपानाची सवय असलेल्या जास्त धोका असलेल्या महिलांसाठी, ही लक्षणे लवकर ओळखून त्वरित वैद्यकीय उपचार सुरू केल्यास उपचारांच्या परिणामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
Cervical Cancer: लसीकरणाने प्रतिबंध करता येणार गर्भाशयाचा कर्करोग, तज्ज्ञांचा सल्ला