फोटो सौजन्य: Freepik
आज जर आम्ही तुम्हाला सांगितले की मोबाईल आज आपली एक दैनंदिन गरज बनली आहे तर यात कोणालाही नवल वाटणार नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत, आपण सर्वेच मोबाईल वापरत असतो. पण आज हाच मोबाईल कित्येकांसाठी एक व्यसन बनला आहे.
लहान मुलं मोबाईलशिवाय जेवत नाही आणि अनेक तरुणांचा रील्स स्क्रोल केल्याशिवाय दिवस जात नाही. परंतु या मोबाईलच्या सतत वापरामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी कमी होतेच पण शरीराला सुद्धा याचा फटका बसतो.
अनेक लहान मुलांना मोबाईलमुळे अगदी कोवळ्या वयातच चष्मे लागत आहे. कितीतरी तरुण रात्री १-२ वाजेपर्यंत मोबाईलवर ऑनलाईन असतात. अनेकांसाठी ही गोष्ट सामान्य जरी असली तरी हे असे रोज करणे तुमच्या शरीरासाठी योग्य नाही. यामुळे पुढील समस्या उद्भवू शकतात.
तणाव वाढू शकतो
सतत मोबाइल नोटिफिकेशनमुळे किंवा मेसेजेसमुळे वाजणे तुमचे स्ट्रेस लेवल वाढवू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचा मेसेज आल्यानंतर त्याचा मेसेजे वेळेत पाहता न आल्याने किंवा त्या व्यक्तीचे वेळेत उत्तर न आल्याने आपल्यातील तणाव वाढू शकतो.
शारीरिक हालचाल कमी होते
मोबाईलचा प्रचंड वापर सर्व वयोगटातील लोकांमध्ये कमी झालेल्या शारीरिक हालचालींशी संबंधित आहे. हल्ली लोक सोशल मीडियावर रील्स बघणे आणि ऑनलाईन गेम खेळणे यात व्यस्त असतात. परिणामी लठ्ठपणा, ह्रदयाचे विकार आणि हाड-स्नायू-संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते.
आपापसातील बोलणे कमी होते
ज्या मोबाईलने आपल्या सर्वाना डिजिटल आयुष्यात जवळ आणले, त्यानेच खऱ्या आयुष्यात अनेकांना लांब नेले आहे. ऑनलाईन चॅटिंगमुळे कित्येक जणांना प्रत्यक्षात नीट बोलता येत नाही. आपण नेहमी ऐकतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे पण मोबाइलचा अतिवापर आज माणसाला एकटा पाडत आहे.
झोपेच्या वेळेत बदल
जे लोक झोपायला जाण्यापूर्वी मोबाईल फोन वापरतात त्यांच्या झोपेची पद्धत बिघडलेली असते. याचे कारण असे आहे की स्क्रीनद्वारे निर्माण होणारा निळा प्रकाश हा मेलाटोनिन या हार्मोनमध्ये व्यत्यय आणतो जो झोपेचे नियमन करण्यासाठी जबाबदार असतो.