Manoj Jarange Patil (Photo Credit- X)
मुंबई: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण आंदोलकाकडून वाढत्या गोंधळावर मनोज जरांगेने पाटलांनी कान टोचले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर गेल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लवकरात लवकर यावर मार्गकाढून सरकारने निर्णय घ्यावा असे त्यांनी सागिंतले. तसेच या भेटीदरम्यान त्यांनी राज्य सरकारला या गंभीर प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली.
त्यानंतर, मनोज जरांगे यांची भेट घेऊन परतत असताना मराठा आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीचा ताफा अडवला आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा, एक लाख मराठा अशा घोषणा देऊ लागले. काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. या सर्वांमुळे जरांगे यांच्या निषेधस्थळी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तथापि, काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना मार्ग दाखवला आणि त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचण्यास मदत केली.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलकांना शांततेचं आणि संयमाचं आवाहन केलं आहे. त्यांच्या व्यासपीठावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा, अगदी तो विरोधी पक्ष किंवा भाजपचा असला तरी, त्याचा सन्मान राखला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. अन्यथा, भविष्यात आपल्याकडे कोणीही येणार नाही, असे त्यांनी आंदोलकांना ठणकावून सांगितले.
पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले की, “आपल्या व्यासपीठावर आलेला आपला शत्रू जरी असला, तरी त्याला सन्मान द्यायला शिका. अन्यथा, इथे कोणीही येणार नाही.” ते पुढे म्हणाले, “मला आता पत्रकारांनी सांगितलं की कोणीतरी गोंधळ घातला. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असाल तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. तो विरोधी पक्षाचा असो किंवा भाजपचा असो. जोपर्यंत आपल्याला सहन होतंय तोपर्यंत सन्मान करा. ज्यावेळी आपल्याला वाटेल की आरक्षण मिळत नाहीये, त्यावेळी आपण बघू काय करायचं ते,” असं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं.
जरांगे यांना त्यांच्या ‘सरसकट’ आरक्षणाच्या मागणीवर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देताना ‘सरसकट’ हा शब्द तुम्ही लावूच नका.” ते पुढे म्हणाले की, जर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारचा या शब्दाला काही आक्षेप असेल, तर त्याला दुसरा पर्याय उपलब्ध आहे. सरकारकडे ज्या ५८ लाख कुणबी नोंदी आहेत, त्याच आधारावर ‘मराठा आणि कुणबी एक आहेत’ असा शासन निर्णय काढावा, अशी त्यांची मागणी आहे.
जरांगे यांनी यावर अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले की, “ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत किंवा ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांनाही पोटजात किंवा उपजात म्हणून आरक्षण द्या.” ‘आरक्षण देताना सरसकट शब्दच वापरू नका,’ असा सल्ला देऊन जरांगे यांनी सरकारसमोर आरक्षणाबाबतचा नवा मार्ग खुला केला आहे, ज्यामुळे कायदेशीर अडचणींवर मात करता येईल, असे त्यांनी सुचवले.