
तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
या वाढत्या समस्येबाबत पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील न्यूरोसायन्स विभागाचे वरिष्ठ संचालक आणि मेंदू व मणका शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. राकेश रंजन सांगतात की, “तरुण वयात मणक्याचे आजार होऊ शकतात, यावर अनेकांचा विश्वास नाही. त्यामुळे मान किंवा पाठ दुखत असतानाही अनेक तरुण त्याकडे दुर्लक्ष करतात. बराच वेळ बसून काम करणे, चुकीची बैठक आणि पुरेशा शारीरिक हालचाली न होणे यामुळे स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात. मात्र, हात-पायांमध्ये अशक्तपणा, शरीराचा तोल जाणे, स्नायू आखडणे किंवा चालण्यात बदल होणे अशी लक्षणे दिसल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कारण ही लक्षणे मणक्यातील मज्जारज्जूवर दबाव येत असल्याचे संकेत असू शकतात.”
तासनतास बसून काम केल्याने मणक्यावर ताण येतो
मुले अभ्यास करताना तसेच मोबाईलचा वापर करताना एकाच ठिकाणी बसून तासनतास घालवतात. तरुण नोकरदार दिवसभर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. मोबाईल पाहताना सतत मान खाली झुकवून ठेवल्यामुळे मानेच्या मणक्याभोवतीच्या स्नायूंवर आणि सांध्यांवर ताण येतो. तसेच सतत बसून राहिल्याने कमरेच्या खालच्या भागावर दबाव पडतो. यामुळे स्नायू आखडणे, मान व पाठ जड होणे, कडकपणा जाणवणे आणि वारंवार वेदना होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी कामाच्या किंवा अभ्यासाच्या दरम्यान थोड्या-थोड्या वेळाने उठून चालणे, हलके व्यायाम करणे आणि शरीर ताणण्याचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. कॉम्प्युटरची स्क्रीन डोळ्यांच्या समोर योग्य उंचीवर ठेवावी. खुर्चीवर बसताना पाठीला आधार असावा आणि पाय आरामात जमिनीवर टेकतील याची काळजी घ्यावी. अनेक तास वाकून बसणे टाळावे.
मुलांनी केवळ अभ्यास करणेच पुरेसे नाही, तर खेळणेही गरजेचे
जास्त वेळ एका ठिकाणी बसून अभ्यास करणे, योग्य उंची नसलेल्या टेबल-खुर्चीच्या वापरामुळे आणि जड दप्तरामुळे मुलांच्या पाठीवर आणि खांद्यांवर ताण येऊ शकतो. हे टाळण्यासाठी पालकांनी मुलांना अभ्यासाबरोबर मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या उंचीनुसार अभ्यासासाठी टेबल-खुर्चीची व्यवस्था करावी. शाळेचे दप्तर हलके ठेवावे. शक्यतो दप्तराचे वजन मुलांच्या शरीराच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. दप्तर दोन्ही खांद्यांवर व्यवस्थित अडकवून नेण्याची सवय लावावी. मैदानी खेळ, चालणे, धावणे आणि वयानुसार योग्य व्यायाम केल्यामुळे स्नायू मजबूत होतात. तसेच शरीराची लवचिकता आणि हालचालींमधील समन्वय सुधारतो व बराच वेळ एकाच जागी बसून राहण्याची सवय कमी होते. मुलांची सतत पाठ दुखत असेल, रात्री त्रास होत असेल किंवा त्यासोबत ताप, हात-पायांमध्ये अशक्तपणा, बधिरपणा अथवा चालताना त्रास होत असेल, तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. हा त्रास केवळ चुकीच्या बसण्यामुळे किंवा जड दप्तरामुळे होत आहे, असे गृहीत धरू नये.
पाठदुखी गंभीर होऊन मज्जासंस्थेवर परिणाम कधी होतो?
मणका शरीराला आधार देतो आणि त्याच्या आत असलेल्या मज्जारज्जूचे संरक्षण करतो. मज्जारज्जूच्या माध्यमातून मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये संदेश पोहोचतात. त्यामुळे मणक्यातील मज्जारज्जूवर दबाव आल्यास हात-पायांच्या हालचाली, ताकद आणि शरीराचा तोल यावर परिणाम होऊ शकतो.
मानेच्या मणक्याजवळील मज्जारज्जूवर दबाव आल्यास हात-पाय सुन्न होणे, हातांची ताकद कमी होणे, वस्तू पकडण्यात अडचण येणे, स्नायू आखडणे, शरीराचा तोल जाणे, वारंवार पडणे किंवा चालण्यात बदल होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही वेळा मान फारशी दुखत नसतानाही ही लक्षणे जाणवू शकतात.
लिहिताना, कपड्यांची बटणे लावताना, कॉम्प्युटरवर काम करताना किंवा एखादी वस्तू हातात घट्ट पकडताना अडचण येत असेल, तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चालताना त्रास होत असल्यास समस्या केवळ पायांमध्येच आहे, असे समजू नये. मानेच्या मणक्यातील मज्जारज्जूवर दबाव आल्यामुळेही पायांच्या हालचालींवर आणि चालण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच मानेपासून हातापर्यंत किंवा कमरेपासून पायापर्यंत वेदना पसरत असतील, तर मज्जातंतूंवर दबाव किंवा दाह होत असल्याची शक्यता असू शकते. ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका!
खालील लक्षणे वारंवार जाणवत असतील किंवा त्यांची तीव्रता वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
१. हात-पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे
२. हात किंवा पाय सुन्न होणे अथवा मुंग्या येणे
३. किरकोळ कामे करतानाही हात दुखणे
४. पायांमध्ये कडकपणा जाणवणे
५. वारंवार तोल जाणे किंवा पडणे
६. चालताना अडखळणे किंवा चालण्याच्या पद्धतीत बदल होणे.
महत्त्वाचे : अचानक हात-पायांमध्ये अशक्तपणा येणे किंवा लघवी व शौचावरील नियंत्रण कमी होणे, ही गंभीर लक्षणे असू शकतात. अशा वेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी पोषणही महत्त्वाचे :
मजबूत हाडे आणि स्नायूंसाठी व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि संतुलित आहार आवश्यक आहे. विशेषतः मुलांच्या वाढीच्या वयात योग्य पोषणाला महत्त्व आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास स्नायूंची ताकद कमी होऊ शकते आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, प्रत्येक वेळी पाठदुखीचे कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असेलच असे नाही. त्यामुळे सतत पाठ दुखत असल्यास स्वतःहून औषधे किंवा सप्लिमेंट्स घेण्याऐवजी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
पाठदुखी किती दिवस सहन करायची व डॉक्टरांकडे कधी जावे?
सतत पाठ दुखत असेल आणि ती वारंवार उद्भवत असेल, रात्री झोपमोड होत असेल किंवा दैनंदिन कामे करताना अडचण येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेदनांसोबत हात-पाय सुन्न होणे, अशक्तपणा किंवा चालताना त्रास होणे अशी लक्षणे असतील, तर तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन रुग्णाच्या स्नायूंची ताकद, प्रतिक्षिप्त क्रिया, संवेदना, शरीराचा तोल आणि चालण्याची पद्धत तपासू शकतात. गरजेनुसार एक्स-रे, एमआरआय किंवा इतर तपासण्या करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
मणक्याचे आरोग्य जपण्यासाठी रोजच्या सवयी बदला :
मणक्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल, मैदानी खेळ, हलके स्ट्रेचिंग आणि स्नायू मजबूत करणारे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. शरीराचे वजन योग्य ठेवणे आणि बसण्याची पद्धत सुधारणेही महत्त्वाचे आहे. मोबाईल किंवा कॉम्प्युटरची स्क्रीन डोळ्यांच्या समोर ठेवावी. बसताना मान आणि पाठीला योग्य आधार द्यावा. बराच वेळ एकाच जागी बसून राहू नये. मध्येच उठून चालावे आणि शरीराची स्थिती बदलावी.
Ans: मोबाईलचा अतिवापर, चुकीची बैठक, तासनतास बसून काम करणे आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत.
Ans: पाठदुखी, हात-पाय सुन्न होणे, अशक्तपणा आणि चालताना तोल जाणे ही संभाव्य लक्षणे आहेत.
Ans: पाठदुखी सतत होत असल्यास किंवा अशक्तपणा, चालताना त्रास अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अचानक अशक्तपणा आल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.