फोटो सौजन्य: Freepik
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइल आणि खानपानाच्या सवयींमुळे आपला दैनंदिन आहार सुद्धा बदलला आहे. आज घरातल्या चपाती भाजीची जागा पिझ्झा आणि बर्गर घेत आहे. मग अशावेळी आपल्याला अनेक आरोग्यासंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक मोठी आणि कॉमन समस्या म्हणजे ॲसिडिटी.
पोटात जास्त प्रमाणात ऍसिड तयार झाल्यामुळे ॲसिडिटी होते. ही समस्या बऱ्याच लोकांसाठी अस्वस्थ आणि वेदनादायक असू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ, पोटदुखी आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
ॲसिडिटीची समस्या हल्ली प्रत्येकाला जाणवत असते. काही जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात तर काही जण अनेक यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी काही पेयांचे सेवन खूप प्रभावी ठरू शकते. चला जाणून घेऊया, अशी कोणती नैसर्गिक पेये आहेत जी ॲसिडिटीपासून आपल्याला आराम देतात.
हे देखील वाचा: आज घरी बनवा ‘ही’ हटके रेसिपी; जाणून घ्या, चायनीज नूडल्स समोसे बनवण्याची सोपी पद्धत
नारळ पाणी हे सर्वोत्तम नैसर्गिक पेयांपैकी एक आहे, ज्याचा उपयोग तुम्ही ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी करू शकता. यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम आपली पचनसंस्था सुधारते आणि पोटातील आम्ल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. नारळाचे पाणी पोटातील ॲसिडला न्यूट्रलाइज करते, ज्यामुळे ॲसिडिटीच्या लक्षणांपासून आपल्याला आराम मिळू शकतो.
कोरफड म्हणजेच एलोवेराचा रस पोटासाठी नैसर्गिक उपचार म्हणून काम करतो. हे आपल्या पचनसंस्थेला शांत करते. एलोवेराच्या ज्युसचे सेवन केल्याने ॲसिडिटीमुळे होणारी चिडचिड आणि सूज कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.
जर तुम्हाला ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळवायचा असेल तर थंड दूध हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे पोटातील ऍसिडचे उत्पादन नियंत्रित करते. थंड दुधाचे सेवन केल्याने पोटातील जळजळ शांत होते आणि ॲसिडिटीमुळे होणारा त्रास कमी होतो.
आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीरातील पचन सुधारतात आणि ॲसिडिटीची लक्षणे कमी करतात. आल्याच्या चहाच्या सेवनाने पोटातील ॲसिडचे प्रमाण कमी होते आणि पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. हे करण्यासाठी, आल्याचे काही तुकडे पाण्यात उकळा आणि थोडे थंड झाल्यावर सेवन करा.
जिऱ्यामध्ये पचन सुधारण्याचे चांगले गुणधर्म असतात, जे पोटातील ॲसिडिटी नियंत्रित करते. जिऱ्याच्या पाण्यामुळे ॲसिडिटीपासून आराम मिळतो आणि पोटातील गॅसची समस्याही कमी होते. ॲसिडिटीच्या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे उकळा आणि ते थंड झाल्यावर प्या.






