Heat and Air Pollution: गरमीसोबत वाढतंय प्रदूषणाचं संकट! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
उष्ण हवा आणि प्रदूषित वातावरणाचा एकत्र परिणाम श्वसनसंस्थेवर होतो. हवेत फिरणारे अतिशय बारीक धुळीचे कण श्वासासोबत शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे काही लोकांना सतत खोकला, दम लागणे, छातीत घट्टपणा किंवा श्वास घेताना घरघर जाणवू शकते. दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये ही लक्षणं आणखी वाढू शकतात. Heat and Air Pollution:
रस्त्यांवरील धूळ, वाहनांचा धूर आणि हवेत मिसळलेले सूक्ष्म कण श्वसनमार्गाला त्रास देऊ शकतात. आधीपासून दमा किंवा अॅलर्जी असणाऱ्यांसाठी हे वातावरण अधिक त्रासदायक ठरू शकते.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे वातावरणातील परिस्थिती बदलते. अशा वेळी प्रदूषण आणि उष्णतेचा शरीरावर एकत्र परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त खोकला येत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं.
उन्हाळ्यात फक्त फुफ्फुसांवरच परिणाम होत नाही. त्वचेलाही या वातावरणाचा फटका बसू शकतो. तापमान वाढल्यामुळे घाम अधिक येतो. त्यात धूळ आणि प्रदूषण मिसळल्यावर त्वचेवरील छिद्र बंद होण्याची शक्यता वाढते.
यामुळे चेहऱ्यावर मुरुम येणे, लालसर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा त्वचेवर जळजळ होणे अशा समस्या काही लोकांना जाणवू शकतात. सतत घाम येणाऱ्या भागांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.
एसी किंवा कुलरमुळे बाहेरच्या गरम वातावरणातून थंड खोलीत गेल्यावर शरीराला अचानक बदल जाणवतो. त्यामुळे घरातील स्वच्छता आणि हवेशीरपणाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
दुपारच्या वेळेत ऊन खूप तीव्र असेल तर शक्यतो बाहेर जाणं टाळावं. कामासाठी बाहेर पडावं लागल्यास चेहरा झाकणे आणि प्रदूषण जास्त असलेल्या ठिकाणी योग्य मास्क वापरणे उपयोगी ठरू शकते.
बाहेरून घरी आल्यानंतर चेहरा, हात आणि उघडे राहिलेले शरीराचे भाग स्वच्छ पाण्याने धुवावेत. त्वचा कोरडी किंवा संवेदनशील वाटत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य मॉइश्चरायझर वापरता येतो. पाणी पिण्याची सवयही या काळात महत्त्वाची आहे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी दिवसभर पुरेसे पाणी घेत राहावे.
Workout and Heart Health: वर्कआऊट फायदेशीर, पण ‘या’ चुका पडू शकतात महागात; हृदयाची काळजी कशी घ्याल?
दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेणे महत्त्वाचे आहे. स्वतःहून औषध बंद करणे किंवा त्यात बदल करणे टाळावे. श्वास घेण्याचा त्रास वारंवार वाढत असल्यास डॉक्टरांना याची माहिती द्यावी. घरातील धूळ कमी ठेवणे, नियमित साफसफाई करणे आणि शक्य असल्यास घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य साधनांचा वापर करणेही मदतीचे ठरू शकते.






