(फोटो सौजन्य-AI एआय)
आपल्याकडे पावसाळ्यात शेतात, घराजवळ, गोठ्यात किंवा बागेत साप दिसण्याच्या घटना बऱ्याच दिसत आहेत.पावसाळा सोडला तरी उन्हाळ्यातही गारव्याला म्हणून साप घरात किंवा थंड ठिकाणी येऊन बसलेले दिसून येत असतातच. तसा हा विषय अगदी महत्त्वाचा आणि सुरक्षेचाही आहे. सापांबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात. प्रत्येक साप विषारी नसतो आणि प्रत्येक सापाचा रंग सारखाही नसतो. काही सापांच्या अंगावर ठळक वर्तुळे, काहींच्या शरीरावर ठिपके, तर काहींचा रंग हिरवट किंवा तपकिरी असतो. त्यामुळे केवळ रंग किंवा आकार पाहून सापाची खात्रीशीर ओळख करणे धोकादायक ठरू शकते. चला हे सविस्तरपाने जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात कोणते विषारी साप आढळतात?
भारतात गंभीर सर्पदंशासाठी प्रामुख्याने नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे 4 साप महत्त्वाचे मानले जातात. घोणस” हा जाड शरीराचा असून त्याच्या पाठीवर गडद तपकिरी, गोलसर ठिपक्यांच्या 3 रांगा दिसतात. हे घोणस जास्त विषारी मानले जाते. त्याच्या दंशाने एक एक करत स्नायू काम करणे बंद होतात आणि मृत्यू होतो. नागाच्या मानेमागे फणा असतो आणि काही नागांच्या फण्यावर चष्म्यासारखीही खूण दिसते. मण्यार सामान्यतः काळसर असून त्याच्या अंगावर पांढरे आडवे पट्टे असू शकतात. फुरसे आकाराने तुलनेने लहान, तपकिरी रंगाचे आणि अंगावर लाटांसारख्या खुणा असलेले असते. ही केवळ प्राथमिक वैशिष्ट्येच आहेत; यांची ओळख तज्ज्ञांकडूनच करून घ्यावी. फक्त दिसण्यावरून कोणत्याही सापाला हात लावणे, पकडणे अतिशय धोक्याचे ठरू शकते.
धामण आणि इतर बिनविषारी साप
धामण हा महाराष्ट्रात आढळणारा बिनविषारी साप आहे. त्याचे शरीर लांब आणि निमुळते असते. रंग तपकिरी, पिवळसर किंवा करड्या छटेत दिसू शकतो. धामण आणि नाग यांच्यात काही वेळा साम्य जाणवू शकते; त्यामुळे सापाची ओळख न पटल्यास जवळ जाणे टाळावे. अजगर हा मोठ्या आकाराचा, जाड शरीराचा साप असून त्याच्या अंगावर तपकिरी आणि फिकट रंगांच्या ठळक नक्षी असतात. कोकण आणि पश्चिम घाट परिसरात स्थानिक अधिवासानुसार वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. आंबा घाटासारख्या सह्याद्रीच्या भागात मलबार पिट व्हायपरसारखे सापही आढळू शकतात.
पावसाळ्यात साप घरात का येतात?
पावसामुळे बिळांमध्ये पाणी शिरणे, प्रजननाचा काळ, अन्नाचा शोध आणि उंदीर किंवा बेडकांची उपलब्धता यांमुळे साप मानवी वस्तीजवळ येत असतात. घरात साप दिसल्यास लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना दूर ठेवा. सापाला मारू नका, काठीने हुसकावू नका आणि पकडण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतरावरून लक्ष ठेवा आणि प्रशिक्षित सर्पमित्राची मदत घ्या.
सर्पदंश झाल्यास पहिल्या क्षणी काय करावे?
सर्पदंश झाल्यास व्यक्तीला शांत ठेवा, हालचाल कमीत कमी करा आणि चावलेला हात किंवा पाय स्थिर ठेवा. रक्तदाब आणि हालचाल जेवढी कमी कराल तेवढे विष कमी पसरेल. अंगठी, घड्याळ किंवा घट्ट वस्तू काढा आणि त्वरित रुग्णालयात न्या. विष तोंडाने वगैरे शोषण्याचा प्रयत्न करू नका, जखम कापू नका, घट्ट दोरी बांधू नका आणि घरगुती उपाय करू नका. सापाचा फोटो सुरक्षित अंतरावरून काढता आला तरच काढा; किंबहुना त्यासाठी वेळ घालवू नका.
सर्पदंशानंतर वेदना कमी असल्या किंवा लक्षणे लगेच दिसली नाहीत, तरी वैद्यकीय उपचार अजिबात टाळू नयेत. योग्य वेळी रुग्णालयात पोहोचणे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेणे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.






