मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम प्रभू आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असून भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत. श्री राम यांच्या आचरणातून प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. राम नवमीच्या निमित्ताने ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्याशी साधलेला संवाद.
अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय. ग. दि. माडगूळकर ज्यांना महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून ओळखलं जातं. ते आणि स्वरतीर्थ आदरणीय श्री. सुधीर फडके ( बाबूजी) यांनी आपल्या आलोकीक प्रतिमेतून तयार केलेली ही कलाकृती आहे. या कलाकृतीने लोकांना इतकं वेड लावलं आहे. त्यातील शब्द, त्यातील गाणी, त्यातील वेगवेगळ्या व्यक्तीरेखा, वेगवेगळे भाव हे शब्दातून, संगीतातून आणि गायनातून त्या उत्कृष्टरित्या त्या व्यक्त झालेल्या आहेत. आता ६६ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि जो पर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत तिच्या शब्दसामर्थ्याच्या पिढ्यानपिढ्या पुढे जात राहतील आणि नवनवीन लोकांनी ते सादर करावं असं मला वाटतं .
मला अस वाटतं की, ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी एक अद्वैत होतं. ग. दि. माडगूळकरांचे जे शब्द असायचे त्याला तशीच योग्य ती चाल बाबूजी लावायचे. त्यांचं कुठलही गाणं घ्या. गीतरामायणातील ५६ गाणी घ्या, चित्रपटातील गाणी घ्या किंवा काही भावगीत घ्या. त्याला बाबूजींची उत्तम चाल लागायची. तेच त्यांच गारूड होतं आणि मुळात म्हणजे त्यांना एकमेकांचा आदर होता. बाबूजींना ग. दि. माडगूळकरांच्या प्रतिमेचा, विद्वत्तेचा, अभ्यासाचा आदर होता, तसंच ग. दि. माडगूळकरांनाही होता आणि उत्तमाला पर्याय नाही, उत्तम म्हणजे उत्तमचं.
एकदा ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे मा. जी. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना गीत रामायणाची प्रचंड आवड होती आणि ते गीत रामायण खूप वाचायचे. त्यांनी एका कार्यक्रमात ग. दि. माडगूळकर आणि बाबुजींना निमंत्रण दिलं होतं आणि यशवंतराव त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी दोघांना जवळ बोालवलं आणि एकमेकांना मिठी मारायला सांगितली आणि त्यांच्यातला वाद मिटला.
गीत रामायणाचे कार्यक्रम करताना बरेच अनुभव आलेत. त्यातले काही काही अनुभव खुप चांगले आले आहेत. मी २००५ पासून कार्यक्रम चालू केलेत. काही अनुभव असेही आलेत की, लोकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. त्या भावना कधीकधी बाहेर येतात. त्या प्रसंगाप्रमाणे त्याची जाणीव झालेली असते. संगीत आणि गायन लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचत असतं. मी कधी कधी लोकांना सांगतो की, माझ्याबरोबर गाणं म्हणा कारण तो ग. दि. माडगूळकर आणि बाबूजींचाच सन्मान आहे. लोक कार्यक्रमाला आले की, बोलो रामचंद्र की जय असं देखील म्हणायचे.
एका गीत रामायणाच्या कार्यक्रमात एक गृहस्थ आले आणि ते म्हणाले, मी मुस्लिम आहे आणि मी अहमदाबादमधून फक्त गीत रामायण ऐकायला आलोय. त्यांनी एक विनंती केली की, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ते मध्यांतरानंतरच गाणं तुम्ही परत म्हणाल का? तर मी म्हणालो, मी अवश्य म्हणतो. आता ग. दि. माडगूळकर आणि बाबूजींचं यश आहे, प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे. तो सर्व प्रसंग आहे आणि ती जी व्यक्ती होती ती सीटवरून उठून खाली बसली आणि त्या गाण्याला मान दिला. अंधूकसा अंधार होता आणि त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ते गाणं पूर्ण झालं आणि नंतर त्यांनी जाताना नमस्कार केला आणि ते गेले. असा त्याचा विलक्षण परिणाम होतो.
कार्यक्रमाच्या निमित्ताने नाही पण अयोध्येला जाण्याचा योग मात्र नक्की आलाय आणि मी दर्शन घेऊन आलोय. गीत रामायणाचे कार्यक्रम लखनऊ, वाराणसी, आग्रा आणि इतर बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत.
रामाला आपण देव मानतो. रामाने आपल्या कर्तृत्वाने देवाचं स्थान मिळवलंय. रामातला कर्तव्य हा गुण मला जास्त भावला आणि राजा कसा असावा जनतेप्रती, लोकांप्रती. त्यांनी कसा न्याय दिला, प्रजेची कशी काळजी घेतली पाहिजे म्हणूनच आपण म्हणतो की, रामराज्य यावं.
बाबूजींनी एक प्रसंग सांगितला होता की, स्वातंत्र्यवीर, सावरकर १९५८ मध्ये एका समारंभाला आले होते . तेव्हा पुण्यात समारंभ झाला होता. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, मला तुझं गीत रामायण ऐकायचं आहे. काही दिवसांनी तिथे पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे याचा सत्कार झाला. त्यावेळेस बाबूजींनी गीत रामायणातील ३-४ गाणी त्यांना ऐकवलीत. त्यातलं एक गाणं होतं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे गाणं ऐकून सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सावरकरांनी बाबुजींच्या पाठीवर केवळ थाप मारली आणि म्हणाले, मी कौतुक कोणाचं करू, तुझं करू की माडगूळकरांच करू. तर बाबूजी म्हणाले , याच्यापेक्षा मोठं पारितोषिक दुसरं नाहीचं.
बाबूजींचा वारसा पुढे नेताना दडपण आत्ताही येतं. मी जेव्हा बाबूजींच कुठलंही गाणं म्हणत असतो तेव्हा माझ्या मनाच्या एका कप्प्यात बाबूजींचं गाणं सुरू असत. ते कसे गायलेत, त्यावेळेस त्यांच्या भावना काय असतील, त्यांनी कसा स्वर लावला आहे, त्यांनी योजलेले शब्द कसे उचरलेले आहेत, हे सगळं माझ्या मनात असतं आणि मला हे लक्षात येतं की, आपण काय तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मी फक्त प्रयत्न करत असतो.
मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करायचं आहे की, १ जुलै ते १० जुलै उत्तर प्रदेशात नैमिषारण्य आहे जिथे प्रभू रामचंद्रांचा निवास होता. तिथे कालीमाता मंदिर आहे तिथे हा कार्यक्रम होणार आहे. आता अयोध्यामध्ये राम मंदिर होत आहे. तिथे त्या गावात गीत रामायणाचे ४ कार्यक्रम होणार आहेत. हा कार्यक्रम पहायला तुम्ही नक्की या!