फोटो सौजन्य - Social Media
नातेसंबंध हे मानवी आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. पण काळाच्या ओघात या नात्यांची व्याख्या, त्याला दिले जाणारे महत्त्व आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धतींमध्ये मोठा बदल झाला आहे. पूर्वीच्या काळात जिथे प्रेमसंबंधांना समाजासमोर खुलेपणाने स्वीकारले जात असे, तिथे आता अनेकजण आपले नाते खाजगी ठेवण्याकडे अधिक झुकतात. सार्वजनिक ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये त्याचा उल्लेख न करता, अनेक नाती केवळ दोघांपुरतीच सीमित राहतात. सोशल मीडियाने हे चित्र अधिक गोंधळात टाकले आहे. इथे नात्यांचे नवेनवे ट्रेंड आणि कोडवर्ड्स तयार झाले आहेत, जे आजच्या तरुण पिढीत खूप लोकप्रिय झाले आहेत. या ट्रेंड्समुळे नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला आहे. प्रेम, जवळीक, बांधिलकी, जबाबदारी या गोष्टी आता वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केल्या जातात. जुनी नात्यांची पारंपरिक चौकट मोडून, तरुण पिढीने एक स्वतंत्र आणि वेगळी डेटिंग संस्कृती निर्माण केली आहे. जी अधिक वैयक्तिक, प्रयोगशील आणि अनेकदा अलिखित नियमांवर आधारित असते.
पॉकेटिंग
या प्रकारात प्रेमसंबंध लपवून ठेवले जातात. ना नातेवाईकांना सांगितले जाते, ना कोणतीही सोशल मीडिया पोस्ट केली जाते. हे नातं जणू खिशात लपवले गेले आहे, म्हणून याला ‘पॉकेटिंग’ म्हटले जाते.
सिच्युएशनशिप
हे नातं स्पष्ट परिभाषेत बसत नाही. दोघांनाही एकमेकांची साथ हवी असते, पण कोणतीही जबाबदारी किंवा लेबल न लावता. ह्यास आपण “सिच्युएशनशिप” म्हणू शकतो.
फ्लीटिंग
फक्त वेळ घालवण्यासाठी सुरू केलेलं नातं. यात प्रेम किंवा बांधिलकी नसते. दोघेही हे नातं गंभीरतेने घेत नाहीत आणि एकमेकांच्या आयुष्यात स्थायिक होण्याची अपेक्षाही करत नाहीत.
बेंचिंग
या पद्धतीत, एक व्यक्ती दुसऱ्याला कायम बॅकअप म्हणून ठेवते. जसे खेळामध्ये एखादा खेळाडू बेंचवर बसवला जातो तसा. नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला जात नाही, पण समोरच्याला पूर्णपणे दूरही केलं जात नाही.
घोस्टिंग
या प्रकारात एक व्यक्ती अचानक बोलणं कमी करू लागते आणि शेवटी पूर्णतः गायब होते. कोणतीही स्पष्ट कारणे न देता नातं संपवलं जातं.
झॉम्बिइंग
पूर्वी संपर्कात असलेली व्यक्ती, जी अचानक नाहीशी झाली होती, ती पुन्हा काही महिन्यांनी परत येते. पूर्वीसारखी वागू लागते, जणू काहीच घडले नव्हते.
ब्रेडक्रंबिंग
या प्रकारात थोडे थोडे लक्ष देऊन नातं जिवंत ठेवलं जातं. पूर्ण संवाद किंवा कमिटमेंट न करता, वेळोवेळी मेसेज करून दुसऱ्याला अडकवून ठेवण्याची ही पद्धत आहे.