शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक 'नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली
Health Update: शस्त्रक्रिया करताना महत्त्वाच्या मज्जातंतूंना इजा होण्याचा धोका असलेल्या रुग्णांसाठी मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये आता तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे. ऑपरेशन सुरू असतानाच मज्जातंतूंच्या कार्यावर सातत्याने लक्ष ठेवून त्यात होणारा बदल तात्काळ शल्यचिकित्सकांच्या निदर्शनास आणून देणारी आयओएनएम म्हणजे इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग प्रणाली पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंच्या कार्यात अचानक बदल झाल्यास तो केवळ शस्त्रक्रियेनंतर लक्षात येण्याऐवजी ऑपरेशन सुरू असतानाच डॉक्टरांच्या निदर्शनास येण्याची शक्यता वाढणार आहे.
मेंदू, मणका, थायरॉईड तसेच कान-नाक-घसा आणि न्यूरोसर्जरीशी संबंधित काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये महत्त्वाच्या मज्जातंतूंच्या अगदी जवळ शस्त्रक्रिया करावी लागते. अशा वेळी मज्जातंतूवर ताण येणे किंवा त्याला इजा होण्याची शक्यता असते. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असताना मज्जातंतूचे कार्य नेमके कसे आहे, यावर सातत्याने लक्ष ठेवता आल्यास संभाव्य धोका वेळीच ओळखणे शक्य होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यातील काही शस्त्रक्रिया मज्जातंतूंच्या अतिशय जवळ कराव्या लागतात.अशा शस्त्रक्रियांमध्ये संभाव्य धोका कमी करण्यासाठी आयओएनएम प्रणाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.
आयओएनएम प्रणाली मज्जातंतूंमधून निर्माण होणाऱ्या विद्युत संकेतांचे शस्त्रक्रियेदरम्यान सतत निरीक्षण करते. या संकेतांमध्ये बदल झाल्यास शल्यचिकित्सकांना तत्काळ सूचना मिळते. त्यानुसार शस्त्रक्रियेची पद्धत बदलणे किंवा मज्जातंतूवरील ताण कमी करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे शक्य होते. थायरॉईडच्या शस्त्रक्रियेदरम्यान स्वरयंत्राशी संबंधित मज्जातंतूला इजा झाल्यास आवाजात बदल होऊ शकतो. त्याचप्रमाणे मेंदू आणि मणक्याच्या काही शस्त्रक्रियांमध्ये मज्जातंतूंच्या कार्यावर परिणाम झाल्यास रुग्णाच्या हालचाली किंवा इतर शारीरिक कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा संवेदनशील शस्त्रक्रियांमध्ये मज्जातंतूंच्या कार्यावर सतत देखरेख ठेवणारी प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.
Ans: नर्व्ह मॉनिटरिंग किंवा Intraoperative Neurophysiological Monitoring (IONM) ही शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतू, मज्जारज्जू किंवा इतर न्यूरल मार्गांची कार्यक्षमता तपासण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे.
Ans: शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंवर ताण किंवा इजा होण्याची शक्यता असल्यास त्यातील बदल लवकर ओळखण्यास मॉनिटरिंग मदत करू शकते. त्यामुळे सर्जनला आवश्यकतेनुसार प्रक्रियेत बदल करण्याची सूचना मिळू शकते.
Ans: स्पाइन, मेंदू, काही ENT, परिघीय मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित काही जटिल शस्त्रक्रियांमध्ये IONM वापरले जाऊ शकते. मात्र प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी ते आवश्यक असेलच असे नाही.






