फोटो सौजन्य सोशल मिडिया
या दोन्ही तंत्रज्ञानांच्या एकत्रित वापरामुळे कर्करोगाशी संबंधित पेशी आणि जनुकीय बदलांची माहिती मिळवून उपचारांचे नियोजन अधिक प्रभावी करण्यास मदत होऊ शकते.
कंपनीने सादर केलेल्या एनजीएस चाचण्यांद्वारे कर्करोगाशी संबंधित जनुकीय बदलांचे सविस्तर विश्लेषण करता येते. त्यामुळे रुग्णाच्या आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य उपचार निवडणे, उपचार सुरू असताना आजारातील बदलांचे निरीक्षण करणे आणि उपचारानंतर कर्करोगाच्या काही पेशी शिल्लक राहिल्या आहेत का, यासंबंधीचे संकेत शोधणे शक्य होऊ शकते. या चाचण्यांमध्ये सीटी-डीएनए, जी-डीएनए आणि आरएनए या जनुकीय घटकांचे विश्लेषण केले जाते.
‘ऑन्कोडिस्कव्हर’ तंत्रज्ञानाच्या मदतीने रक्तातील अतिशय कमी प्रमाणातील कर्करोगाच्या पेशी शोधणे आणि त्यांची संख्या मोजणे शक्य असल्याचे कंपनीने सांगितले. यासाठी विशेष तंत्रज्ञानासह प्रतिदीप्ती सूक्ष्मदर्शिकेचा वापर केला जातो. जनुकीय चाचण्यांसोबत या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कर्करोगाच्या पेशींविषयी आणि त्यांच्याशी संबंधित जनुकीय बदलांविषयी पूरक माहिती मिळू शकते.
Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे
डॉ. जयंत खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या ‘ऑन्कोडिस्कव्हर’ला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेची मान्यता मिळाली असून, साध्या रक्ताच्या नमुन्यातून कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी मान्यता मिळालेले हे भारतातील पहिले आणि एकमेव वैद्यकीय परीक्षण असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे तंत्रज्ञान पंधराहून अधिक प्रकारच्या घन स्वरूपातील कर्करोगासाठी वापरता येते, असेही कंपनीने नमूद केले.
‘द्रव ऊतकपरीक्षण’ (लिक्विड बायोप्सी) या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ प्रा. क्लाउस पँटेल आणि प्रा. कॅथरीन अलिक्स-पानाबिएर यांनी परिषदेत या तंत्रज्ञानाच्या एकत्रित वापराचे महत्त्व अधोरेखित केले. कर्करोगाच्या पेशींवरील संशोधनाचा उपयोग नियामक मान्यता मिळालेल्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केल्याचे प्रा. पँटेल यांनी नमूद केले. तर, ‘ऑन्कोडिस्कव्हर’ आणि एनजीएस चाचण्यांमधून मिळणारी माहिती कर्करोगाच्या नियमित उपचारांमध्ये अधिक प्रभावीपणे वापरण्याची संधी असल्याचे प्रा. अलिक्स-पानाबिएर यांनी सांगितले.
वैद्यकीय प्रतिमांकन चाचण्यांमध्ये कर्करोग दिसत नसला, तरी रक्तात कर्करोगाच्या काही पेशी किंवा जनुकीय संकेत शिल्लक असण्याची शक्यता असते. अशा पेशींचा शोध आणि त्यांचे निरीक्षण भविष्यात आजाराच्या पुनरागमनाचा किंवा इतर भागांत प्रसार होण्याचा धोका समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते, असे डॉ. जयंत खंडारे यांनी स्पष्ट केले.
डॉ. जयंत खंडारे आणि अरविंदन वासुदेवन यांनी २०१३ मध्ये अॅक्टोरियस कंपनीची स्थापना केली. रक्तातील कर्करोगाशी संबंधित जैविक संकेत शोधणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासावर ही कंपनी काम करत असून, ‘ऑन्कोडिस्कव्हर मेटास्टॅट’ ही प्रणाली सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे.
अॅक्टरेकच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत डॉक्टर आणि संशोधकांना रक्ताच्या नमुन्यावर आधारित पेशींचे परीक्षण आणि जनुकीय चाचण्या यांच्या एकत्रित वापरातून कर्करोगाच्या निदानापासून उपचारांच्या निरीक्षणापर्यंत कोणत्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात, यावर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.






