फोटो सौजन्य - Social Media
आजकाल शहरी भागात, मॉल, हॉटेल, ऑफिस किंवा मल्टिप्लेक्समध्ये वॉशरूममध्ये गेले की भिंतीवर लावलेला चमचमीत हॅन्ड ड्रायर सहज नजरेस पडतो. हात धुतल्यानंतर गरम वाऱ्याच्या झोताने काही सेकंदांत हात कोरडे होतात, किती सोयीस्कर, नाही का? पण हीच सुविधा तुमचं आरोग्य धोक्यात घालू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?
ड्रायरचा वापर म्हणजे बॅक्टेरियांसाठी खुले आमंत्रण!
हॅन्ड ड्रायरमधून बाहेर येणारा हवा गरम असतो, पण ती हवा स्वच्छ असेलच असं नाही. संशोधनात असं आढळलंय की हॅन्ड ड्रायरमुळे वॉशरूममधील हवेत असलेले बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतू सरळ तुमच्या ओल्या हातांवर येतात. त्यामुळे टिशूने पुसलेल्या हातांपेक्षा, ड्रायरने वाळवलेले हात अधिक अस्वच्छ ठरतात.
त्वचेला त्रास : लपलेला धोका
वारंवार ड्रायरचा वापर केल्याने गरम वाऱ्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे हात कोरडे, खवखवीत होतात, कधी कधी खाज, रॅशेस सुद्धा होतात – विशेषतः ज्यांची त्वचा नाजूक आहे, त्यांच्यासाठी ही सवय धोकादायक ठरते.
पोट आणि श्वसनाशी संबंधित आजार
हात स्वच्छ न राहिल्यास जेवण करताना तेच बॅक्टेरिया शरीरात जातात आणि त्यामुळे पोटदुखी, उलटी, जुलाब होऊ शकतात. शिवाय, ड्रायरमधून उडणाऱ्या धूळकणांमुळे अॅलर्जी किंवा दमा असलेल्या लोकांमध्ये त्रास वाढू शकतो.
वायरल इन्फेक्शनसाठी खतपाणी
वॉशरूम ही आधीच बंद जागा. अशा ठिकाणी जर ड्रायर सतत चालू असेल, तर हवेत असलेले व्हायरस अधिक प्रमाणात पसरतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
तर मग काय करावं?
हॅन्ड ड्रायर वापरणं गैर नाही, पण त्याचा अतीवापर टाळणं हेच शहाणपण. चमचमीत सोयीमागे लपलेला धोका ओळखा आणि थोडी खबरदारी घेऊन स्वतःचं आरोग्य जपा.