” हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा ” असं शिवरायांच्या अनेक विचारांपैकी हे एक वाक्य इतिहासात अमर आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात म्हणजेच वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्नराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. शहाजी राजांनी पाहिलेल्या स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ आणि शिवरायांनी सत्यात उतरवलं. मुठभर सैन्य, हजारांच्या संख्येने आक्रमण करणाऱ्या परकीय सत्ता, यांच्यासमोर निभाव लागणं मोठं दिव्य स्वराज्यासमोर होतं. मात्र कधी गनिमी कावा तर ढाल तलवारींनी मराठ्यांनी परकीय सत्तांना दणाणून सोडलं होतं. महाराष्ट्रात म्हणजेच स्वराज्याच्या मातीत पाय ठेवणारा परमुलुखातील प्रत्येक सरदार शिवरायांना घाबरुन असे. राजांचं कार्यकाळ अवघ्या सुमारे 35 वर्षांचा होता. या पस्तीस वर्षांच्या कार्यकाळात राजांनी पहिली मोहिम जिंकली ती तोरणा किल्याची आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यानंतर अनेक किल्ले स्वराज्यात आले. अफजल खान, सिद्धी जोहर ,दिलेर खान अशा कितीतरी स्वराज्यावर चालून येणाऱ्या यवनांचा राजांनी खात्मा केला.
अवघ्य़ा पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत एवढा डोलारा सांंभाळण्यासाठी स्वराज्यात जीवाला जीव देणारी मातब्बर सरदारही होते. सततच्या धावपळी, नव्या मोहिमा, राजकारणातील डावपेच, सत्ता, स्वराज्य, घर कुटुंब या सगळ्यात कालांतराने राजांची तब्बेत ढासळत गेली. अखेर स्वराज्याचा हा तेजस्वी सूर्य 3 एप्रिल 1680 मध्ये मावळला. राजांच्या महानिर्वाणावरुन देखील इतिहासकारांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. राजांनी अखेरचा श्वास रायगडावर घेतला.राजांची समाधी देखील रायगडावर आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल विविध मते आहेत. काही ऐतिहासिक संदर्भांनुसार महाराजांना ताप आणि अतिसारामुळे मृत्यू झाला, तर काही संशोधक असेही सांगतात की त्यांना विषप्रयोग करून मारण्यात आले. तथापि, याबाबत निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत.
राजांनी अनेक सरदारांना वतनदारांना सळो कि पळो करुन सोडलं होतं. स्वराज्यात जसे जीवाला जीव देणारे सरदार होते तसेच पदासाठी हपापलेले आणि फितुरी करणारे ही होते. अनेकांना शिवरायांच्या धाडसाचं आणि कर्तृत्वाबाबत असुरक्षितता होती. राजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालट झाली. यावेळी अनेक फितुरांनी आणि परकीय सत्तांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मात्र शंभूराजेंनी कटकारस्थान रचणाऱ्य़ांचा डाव वेळोवेळी हाणून पाडला. शिवरायांच्या मृत्यूनंतरच बादशाह औरंगजेबाने पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाऊल ठेवलं. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी रायगड किल्ल्यावर बांधण्यात आली. आजही लाखो शिवभक्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आणि पराक्रम यामुळेच ते भारताच्या इतिहासात अजरामर झाले. त्यांचे कार्य आणि ध्येय आजही अनेकांना प्रेरणा देते.त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याबाबत आजही संशोधन सुरू आहे, पण त्यांच्या निधनाने मराठा साम्राज्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं हे निश्चित आहे.