फोटो सौजन्य - Social Media
प्राचीन काळी पृथ्वीवर मल्ल आणि मणी नावाचे दोन बलाढ्य असुर उत्पात माजवत होते. दोघांनी कठोर तप करून प्रचंड शक्ती मिळवली होती. त्यामुळे त्यांच्या अत्याचाराने पृथ्वी, देव, ऋषी सर्वजण भयभीत झाले होते. जिथे तिथे अन्याय, हिंसा आणि अराजकता वाढत होती. अखेर देवांना हे सहन झालं नाही आणि सर्व देवदेवता एकत्र येऊन कैलासावर भगवान महादेव शंकर यांच्या शरण गेले. देवांनी विनंती केली, “हे त्रिलोकीनाथ शंकरा, पृथ्वीवरील धर्म धोक्यात आला आहे. मल्ल-मणींच्या अत्याचारापासून आम्हाला वाचवा.” तेव्हा भगवान शंकरांना समजलं की पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी त्यांना स्वतः अवतार घ्यावा लागेल. पार्वती माता देखील या दिव्य कार्यात सहभागी झाल्या.
शंकर-पार्वती यांनी जेजुरी पर्वतावर तेजस्वी, स्वर्णवर्णी रूप धारण केलं. हातात खंडा, डोक्यावर किरीट, डोळ्यात प्रचंड तेज आणि निळ्या घोड्यावर आरूढ, असा हा अवतार ‘श्रीखंडोबा’ किंवा ‘मल्लारी मार्तंड’ म्हणून ओळखला जाऊ लागला. शंकरांचा हा अवतार म्हणजे धर्माचा रक्षक आणि भक्तांचा तारणहार! खंडोबा अवताराची बातमी असुरांपर्यंत पोहोचली. मणी हा मायावी शक्तींमध्ये तरबेज होता. त्याने मोठ्या सैन्यासह युद्धास हजेरी लावली. काही क्षणातच रणांगण धूर, धुळीने भरून गेलं. मणीने हजारो रूपं धारण करून शत्रूला भुलवण्याचा प्रयत्न केला; पण महादेवाच्या अवतारासमोर त्याची माया क्षुद्र ठरली. खंडोबाने अखेरीस आपल्या खंड्याने मणीचा वध केला. मृत्यूपूर्वी मणीने विनंती केली, “देवा, माझं नाव तुझ्या स्मरणात कायम राहू दे.” तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन वर दिला “आजपासून माझ्या लिंगात ‘मणी’ रूपाने तू विराजमान राहशील. माझ्या आरतीत तू दीप बनून प्रकाश देशील.” आजही ‘मणी’ दीप खंडोबाच्या आरतीचा अविभाज्य भाग मानला जातो.
भावाचा वध झाला ऐकून असुरराज मल्ल क्रोधाने फणफणला. मणीपेक्षा अधिक बलाढ्य आणि घमेंडी असलेला मल्ल स्वतःच महायुद्धासाठी उतरला. त्याच्या मायावी अस्त्रांमुळे युद्ध अधिक भयंकर झालं. अनेक दिवस चाललेल्या लढाईत पृथ्वी थरथरली. पण खंडोबा म्हणजेच महादेव शंकर! त्यांच्या खंड्याच्या एका प्रहाराने मल्ल कोसळला. मृत्यूपूर्वी त्याने हात जोडले, “देवा, माझी चूक क्षमा कर. पण माझं नाव शतकानुशतके तुझ्याशी जोडलेलं राहू दे.”तेव्हा शंकरांनी त्याला वरदान दिलं “आजपासून माझं नाव ‘मल्लारी मार्तंड’ म्हणून जगभर प्रसिद्ध होईल. तुझा वध हा माझ्या लीलेचा महत्त्वाचा भाग म्हणून भक्त सांगतील.”
मल्ल-मणींचा संहार केल्यानंतर पृथ्वी पुन्हा शांत झाली. जेजुरी पर्वत खंडोबाच्या शक्ती आणि भक्तीचे मुख्य स्थान बनले. आजही तेथे “येल्कोट येल्कोट जय मल्हार!” ही गर्जना घुमते. शंकर आणि पार्वती दोघांनीही जेजुरीतच वास करण्याचा निर्णय घेतला. पार्वती मातेला येथे “मळाई देवी” म्हणून मान मिळाला.






