संग्रहित फोटो
पुणे :राज्यसह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी पुणे शहरातील तीन व्यक्तींना शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तब्बल ५७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूकीच्या घटना पुन्हा वाढल्याचे दिसत आहे.
पहिल्या घटनेत ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात मोबाईल धारक, लिंक धारक तसेच अॅप आणि बँकेच्या खाते धारकांवर आयटी अॅक्टसह इतर कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार जुलै ते ऑगस्ट २०२५ या एक महिन्याच्या कालावधीत घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार संजय पार्क येथे राहण्यास आहेत. तक्रारदारांना सायबर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवून शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. त्यानंतर फोनद्वारे संपर्क साधत त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखविले. एक अॅपद्वारे त्यांना शेअरर्सची माहिती देखील देण्यात आली. त्यानंतर त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी वेगवेगळ्या खात्याद्वारे एकूण ३९ लाख ७ हजार २०० रुपये पाठवले. मात्र, नंतर त्यांना परतावा किंवा मुळ रक्कम न देता त्यांची फसवणूक केली.
दुसऱ्या घटनेत अशाच पद्धतीने एका ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी ८ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून केवळ २२ दिवसात सायबर चोरट्यांनी पैसे उकळले आहेत. तसेच, विश्रांतवाडी भागातील ४४ वर्षीय व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या आमिषाने ९ लाख ८ हजार ८६१ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.






