फोटो सौजन्य: Freepik
आज साधं वरण भात जरी आपल्याला बनवायचा असला तरी कुकरची गरज भासते. रोज कित्येक घरात कुकरचा वापर केला जातो. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वयंपाक करताना गृहिणी इतर अनेक कामेही करू शकतात. कोरोना काळात तर कित्येक जणांनी याच कुकरच्या सहाय्याने कधी नव्हे ते पहिल्यांदा घरगुती केक बनवून पहिला होता.
आज आपण असे किती तरी व्हिडिओ पाहतो ज्यात अचानकपणे कुकरचा स्फोट होतो. काही वेळेस या घटनांमुळे जीवितहानी सुद्धा होऊ शकते. तसेच दरवर्षी या घटनेत वाढ होत आहेत. यामुळेच प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवताना खूप काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा कुकर लावताना आपल्याकडून काही सामान्य चुका होत असतात ज्या पुढे जाऊन स्फोटाचे कारण बनू शकतात. चला जाणून घेऊया, कोणत्या कारणांमुळे कुकरचा स्फोट होतो.
कुकरची क्षमता लिटरमध्ये मोजली जाते. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न भरले जाते, तेव्हा स्फोट होण्याचा धोका वाढला जातो. वास्तविक, असे घडते कारण कुकरमध्ये जास्त अन्न भरल्याने त्याचे व्हेंट बंद होते, ज्यामुळे वाफ बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळेच लक्षात ठेवा, कुकर नेहमी तीन चतुर्थांश भरला पाहिजे.
हे देखील वाचा: सतत डाळभात खाऊन कंटाळा आहे का? मग झटपट बनवा पारंपरिक मसाले भात
एखादा पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवताना त्यात योग्य प्रमाणात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जास्त पाणी असल्यास कुकरमधून पाणी सांडते आणि कमी पाणी असल्यास अन्न बाहेर येणंच धोका असतो. काही वेळेस कुकर फुटण्याचीही भीती असते.
कुकर साफ करणे हे म्हणायला सोपे जरी असले तरी अवघड काम आहे, त्यामुळे बरेच लोक कुकरला साफ आणि स्वच्छ करण्याचे कष्ट घेत नाही. परिणामी कुकरच्या व्हेंटमध्ये कचरा अडकल्याने कुकर फुटण्याचा धोकाही असतो. त्यामुळे कुकर पूर्णपणे स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे.
कुकर जबरदस्तीने किंवा लगेच उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा स्फोट होण्याचा धोका वाढतो. वास्तविक, गॅस बंद केल्यानंतर, कुकरमध्ये दाब राहतो, जो हळूहळू बाहेर येतो. पण बळजबरीने किंवा लगेचच कुकर उघडण्याचा प्रयत्न केल्यावर तो कधी कधी दबावामुळे फुटतो.
प्रेशर कुकर फुटण्याचे कारण तुटलेले रबर, शिट्टी, सेफ्टी व्हॉल्व्हमध्ये बिघाड, रेग्युलेटर व्हॉल्व्हचे कमी किंवा जास्त वजन हे देखील असू शकते. याशिवाय खराब दर्जाच्या किंवा जुन्या कुकरमध्येही स्फोट होण्याची शक्यता जास्त असते.