फोटो सौजन्य - Social Media
बर्याच लोकांना असं वाटतं की ब्लड शुगर वाढण्याचं मुख्य कारण फक्त गोड खाणं आहे. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती गोड पदार्थ, मिठाई किंवा शीतपेय सोडतो आणि तरीही त्याची साखर वाढते, तेव्हा आश्चर्य आणि काळजी वाटते. पण प्रत्यक्षात मधुमेह (Diabetes) नियंत्रणात न राहण्यामागे अनेक वेगवेगळ्या कारणांचा हात असतो. फक्त गोड खाणं टाळून किंवा वेळेवर औषधं घेऊन हा आजार पूर्णपणे कंट्रोल करता येत नाही.
चला जाणून घेऊया ब्लड शुगर वाढण्यामागची महत्त्वाची कारणं:
जास्त कार्बोहायड्रेट्स असलेलं अन्न
फक्त गोड न खाल्ल्याने साखर कमी होईल असं नाही. कारण कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्यावर ते ग्लुकोजमध्ये बदलतात. जर तुम्ही रोटी, भात, बटाटे, पास्ता, ब्रेड, नूडल्स किंवा प्रोसेस्ड स्नॅक्स वारंवार खात असाल, तर त्याने रक्तातील साखर पटकन वाढते. त्यामुळे कार्बोहायड्रेट्सवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
उच्च ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ
काही पदार्थ गोड नसतानाही रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. त्यांना हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स म्हणतात. उदाहरणार्थ – पांढरी ब्रेड, पांढरा भात, बटाटे, टरबूज आणि कॉर्नफ्लेक्स. हे लवकर पचतात आणि शुगर पातळी अचानक वाढवतात. याउलट, डाळी, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्ये आणि सुका मेवा हे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स आहेत, जे हळूहळू पचतात आणि शुगर नियंत्रणात ठेवतात.
शारीरिक हालचालींची कमतरता
व्यायाम न करणं किंवा कमी हालचाल करणं शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवतं. इन्सुलिनमुळे शुगर पेशींमध्ये जाऊन उर्जा तयार होते. पण हालचाल कमी केल्याने स्नायूंना कमी उर्जा लागते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता घटते. त्यामुळे शुगर रक्तातच राहते व पातळी वाढते.
ताणतणाव (Stress)
मानसिक ताण आणि ब्लड शुगर यांचा थेट संबंध आहे. ताण आल्यावर शरीरात कोर्टिसोल आणि अॅड्रेनालाईन हे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स शरीराला “फाइट ऑर फ्लाइट” स्थितीत नेतात आणि लिव्हरमधील ग्लुकोज रक्तात सोडला जातो. जर ताण सतत राहिला तर शुगर लेव्हलही सतत वाढलेली राहते.
झोप पूर्ण न होणे
नीट झोप न लागणं किंवा कमी झोप घेणं हेही शुगर वाढण्याचं कारण आहे. झोपेच्या अभावामुळे शरीराची नैसर्गिक सर्केडियन रिदम बिघडते, ज्यामुळे कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं आणि इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. त्याचबरोबर घ्रेलिन आणि लेप्टिन या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचा तोल बिघडतो. त्यामुळे वारंवार जास्त कार्बोहायड्रेट्स किंवा गोड खाण्याची इच्छा होते.
फक्त गोड खाणं टाळून ब्लड शुगर नियंत्रित ठेवता येत नाही. कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण, खाण्याचे प्रकार, व्यायाम, ताणतणाव आणि झोप यावरही तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि मानसिक संतुलन ठेवल्यास शुगर नियंत्रणात राहू शकते.