अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Vladimir Putin India Visit News : मॉस्को/नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी डिसेंबरमधील तारिखही निश्चित करण्यात आली आहे. रोसकाँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन ५ डिसेंबर रोजी भारतात येणार आहे. यावेळी ते रशिया-भारत फोरमच्या अधिवेशनात सहभागी होतील. अमेरिकेच्या दबावाला झुगारुन पुतिन यांचा हा दौरा होत आहे.
यावेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत एक वार्षिक बैठक होणार आहे. भारत आणि रशिया संबंधासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिवाय पुतिन यांचा हा दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेने रशियाच्या तेल व्यापारावर निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यात या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
याशिवाय या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशात आर्थिक, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही चर्चा होईल. क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण सहकार्य हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून यावर भारत आणि रशियामध्ये मोठ्या कराराची अपेक्षा व्यक्त केली आहे.
क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, S-400 हवाई संरक्षण प्रमाली आणि Sukhoi-57 (Su-57) च्या पाचव्या पिढीतील फायटर जेट बाबक मोठा करार होण्याची शक्यता आहे. पुतिन यांचा हा दौरा २०२१ नंतर पहिला अधिकृत भारत दौरा आहे. यामुळे याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये तणावाचे वातावरण आहे. रशियाकडून तेल खरेदीवरुन हा तणाव निर्माण झाला होता. अमेरिका भारतावर रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी बंद करण्यासाठी दबाव आणत आहे. सध्या भारताने तेल खरेदी कमी केली आहे. परंचु पूर्णत: तेल खरेदी बंदीवर नकार दिला आहे. यामुळे भारतासाठी पुतिन यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शिवाय अमेरिकेने रशियावरही अनेक निर्बंध लादले आहेत.
ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची चीनमध्ये तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेते पुतिन यांच्या गाडीतून भेटीनंतर एकत्र चर्चेसाठी गेले, दोन्ही नेत्यांमध्ये ४० मिनिटे गाडीत गुप्त चर्चा देखील झाली. शिवाय ऑक्टोबरमध्ये देखील दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली होती. यावेळी दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली. मोदी आणि पुतिन यांची मैत्री अत्यंत घनिष्ठ मानली जाते.






