ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशन
आताच्या काळात स्त्रिया आपल्या बायोलॉजिकल क्लॉकशी जखडून राहिलेल्या नाहीत. आपल्याला मूल कधी हवे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्यांच्यापाशी आहे आणि त्यामुळे कुटुंबनियोजनाची पूर्वापार चालत आलेली संकल्पना बदलून गेली आहे. यामुळे स्त्रियांना आपले करिअर घडविण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे आणि आपण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेपर्यंत मूल होण्याचा निर्णय लांबविणे त्यांना शक्य होत आहे.
यासाठी ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशन ही प्रक्रिया अधिक चांगली ठरत आहे. डॉ. पारुल अग्रवाल, चीफ सीनिअर कन्सल्टंन्ट, आयव्हीएफ अँड फर्टिलिटी, क्लाउडनाइन हॉस्पिटल, नोएडा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशन प्रक्रिया काय आहे?
ऊसाइट क्रियोप्रिझर्व्हेशन प्रक्रिया काय असते
ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशन या प्रक्रियेमध्ये फलन न झालेले स्त्री बिजांड किंवा ऊसाइट गोठवून ठेवले जाते. भविष्यातील वापरासाठी या अंड्यामध्ये असणाऱ्या फलनक्षमतेचे जतन करण्यासाठी ते पुनर्प्राप्त केले जाते व साठवून ठेवले जाते.
गोठवलेल्या ऊसाइटपासून पहिल्या मानवी जीवाचा जन्म झाल्याची घटना पार 1986 सालची आहे आणि तेव्हापासून वैद्यकीय क्षेत्राने वेगाने प्रगती केली असून त्यातून फलनाची संभाव्यता व यशस्वी प्रसूतीच्या संख्येने उसळी घेतली आहे. ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशन पद्धतीचा शोध लागला तेव्हा तिचा वापर कर्करोगावरील उपचार घेत असलेल्या महिलांची अंडी जतन करण्यासाठी केला गेला आणि त्यामुळे कर्करोगमुक्त झाल्यानंतर मूल जन्माला घालणे त्यांना शक्य झाले. मात्र आता या तंत्राच्या वापराचा आवाका खूपच विस्तारला असून त्यातून स्त्रियांना आपला प्रजननक्षम असण्याचा कालावधी विस्तारण्याची संधी मिळाली आहे.
हेदेखील वाचा – गरोदर माता आणि न जन्मलेल्या बाळांना हेपेटायटिस बी संसर्गाचा धोका अधिक
ही प्रक्रिया कशी होते
ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशनची प्रक्रिया सर्वसाधारणपणे एका ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाउंड तपासणीपासून सुरू होते आणि अंडाशयाचे आरोग्य व कार्यक्षमता यांचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक रक्ततपासण्यांची एक मालिका पूर्ण केली जाते. अल्ट्रासाउंडमुळे अंडाशयामध्ये उपलब्ध बीजांडांची संख्या निश्चित करण्यास मदत होते.
काय आहे पुढची स्टेप
कशा पद्धतीने होते ऊसाइट क्रियोप्रिझर्व्हेशन
यापुढील पायरी म्हणजे अंडाशयास उत्तेजना देणारी हार्मोन इंजेक्शन्स 9-12 दिवसांसाठी दिली जातात. यासाठीचा नेमका कालावधी फिजिशियनद्वारे ठरविला जातो. यानंतर 30-45 मिनिटांत पार पडणाऱ्या एका प्रक्रियेद्वारे योनीमार्गे उपकरण अंडाशयामध्ये पोहोचवून तेथील बीजांडे काढून घेतली जातात. सर्वसाधारणपणे या प्रक्रियेदरम्यान रुग्णास सौम्य भूल दिली जाते.
बीजांडे यशस्वीपणे काढून घेतल्यानंतर त्यांना त्वरेने थंड करून द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवली जातात. असे केल्याने बर्फाचे स्फटिक जमण्यास प्रतिबंध होतो आणि अंड्यांच्या नाजूक पेशींना इजा पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली जाते.
हेदेखील वाचा – World IVF Day: आयव्हीएफ उपचारांबद्दलच्या गैरसमजुती, पद्धतीबाबत घ्या जाणून
जतन करून ठेवणे
ही गोठवलेली बीजांडे वापरण्याची स्त्रीची इच्छा होईपर्यंत अनेक वर्षांसाठी जतन करून ठेवता येतात. तिचा निर्णय झाला की ती गोठलेल्या अवस्थेतून बाहेर काढली जातात, शुक्राणूंबरोबर त्यांचे फलन केले जाते व इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) प्रक्रियेद्वारे त्यांचे गर्भाशयामध्ये रोपण केले जाते.
महिलांसाठी वरदान
बाळाला जन्म देण्यासाठी महिलांसाठी वरदान
ही प्रक्रिया महिलांसाठी एक वरदान ठरली आहे, कारण त्यामुळे त्यांना आपल्या बायोलॉजिकल क्लॉकच्या तगाद्याची चिंता न करता आपल्या आयुष्याविषयी आणि करिअरविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्याची मुभा मिळते. मातृत्व हे एक पूर्ण वेळचे काम आहे, ज्यामध्ये संपूर्ण ध्यान एकाच विषयावर केंद्रित करावे लागते व समर्पणभावना लागते आणि पूर्णवेळच्या करिअरच्या वाढत्या मागण्या बघता मातृत्व आणि करिअर यात समतोल साधणे दिवसेंदिवस अधिकाधिक अवघड होत चालले आहे.
महिलांसाठी पर्याय
अधिकाधिक स्त्रिया आपल्या बायोलॉजिकल क्लॉकच्या मागणीला शरण जाण्याऐवजी काही काळ वाट पाहण्याचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. रेडिएशन, केमोथेरपी उपचार घेत असलेल्या किंवा पीसीओएस आणि एंडोमेट्रिएसिससारख्या समस्या असलेल्या स्त्रियांनाही आपला प्रजननक्षम असण्याचा कालावधी आक्रसत चालल्याच्या विचाराने उद्विग्न होण्याऐवजी आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करता येत आहे.
आजच्या जगामध्ये उशीरा लग्न होणे ही सर्वमान्य रीतच बनून गेली आहे. अशावेळी ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशनमुळे स्त्रीच्या अल्पकाळ टिकणाऱ्या फर्टिलिटी विंडोचे आयुर्मान विस्तारण्यास मदत होत आहे.
डॉक्टरांचा सल्ला
असे असले तरीही स्त्रियांनी तिशीच्या सुरुवातीला किंवा आपली प्रजननयंत्रणा सर्वाधिक कार्यक्षम असण्याच्या वयामध्ये बीजांडे गोठविण्याचा निर्णय घ्यावा असा सल्ला डॉक्टरांकडून सर्वसाधारणपणे दिला जाते, कारण ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशनच्या यशस्वीतेच्या प्रमाणावर वयासारख्या घटकांचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
तरूण वयात करणे योग्य
ही प्रक्रिया तुलनेने तरुण वयामध्ये केल्यास काढून घेतल्या जाणाऱ्या बीजांडांचा दर्जा अधिक चांगला असतो आणि पुढील काळात ती जिवंत राहण्याची तसेच सुफलित होण्याची शक्यता खूप जास्त असते सर्वच अंडी गोठविण्याच्या आणि त्यानंतर गोठलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत तग धरू शकत नाहीत, तसेच सर्वच फलित बीजांडे यशस्वी गर्भधारणेची हमी देऊ शकत नाहीत.
तरीही कोणत्याही वयामध्ये निर्णय घेताना तो संपूर्ण माहितीनिशी घेणे नेहमीच महत्त्वाचे ठरते आणि हे तेव्हाच घडू शकते जेव्हा स्त्रियांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार आरोग्य व्यवस्थापन करून देणाऱ्या संस्था उपलब्ध होताता, जिथे त्यांना आपली प्रजननाशी निगडित उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यासाठी सुरक्षित आणि वक्तशीर पद्धतीने मदत केली जाते. बीजांडे गोठविण्याची प्रक्रिया ही मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये समतोल साधू पाहणाऱ्या स्त्रियांसाठी एक आशेचा दीपस्तंभ ठरली आहे.