फोटो सौजन्य - Social Media
भारतीय पुराणांमध्ये असुर, दैत्य तसेच दानव अशा विविध परंपरा दाखवल्या गेल्या आहेत. तिन्ही नावे जरी वेगवेगळ्या असले तरी त्यांचा संबंध एकाच घराशी येतो. ते म्हणजे ‘कश्यप ऋषी’! होय, या तिन्ही वंशाचा थेट संबंध ‘कश्यप ऋषी’ यांच्याशी जोडला गेला. मुळात, असुर म्हणजे कोण? तर सूर म्हणजे देव आणि असुर हा सुराचा विरुद्धार्थी शब्द आहे. देवाच्या सदैव विरोधात असणाऱ्याला असुर असे संबोधले जाते.
दैत्य आणि दानव, हे एकाच वंशात आलेले घटक आहेत. ऋषी कश्यपांची पत्नी दितीकडून आलेल्या वंशांना दैत्य असे म्हंटले जाते तर पत्नी दानूकडून आलेल्या वंशांना दानव असे म्हंटले जाते. दैत्य या वंशावळीत हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष तसेच महाबळीसारखे दैत्य जन्मले. मुळात, सगळे असुर एक तर दैत्य असतील किंवा दानव! पण प्रत्येक दैत्य किंवा दानव असुर नसतो. ज्या दैत्याने किंवा दानवाने, त्याच्या कारकिर्दीत देवाच्या विरोधात जाऊन कर्म केले असतील तर त्याची मोजणी असुरांमध्ये गणली जाते.
मग राक्षस कोण?
राक्षस दैत्य किंवा दानवासारखी वंशावळ नाही. परंतु, पुराणांमध्ये हिंस्र प्रवृत्ती असणाऱ्यांना राक्षस असे म्हंटले गेले आहे. रावणाला राक्षसांचा पहिला राजा म्हणून ओळखले जाते, ज्याने सर्व दैत्य आणि दानवांना, एकंदरीत असुरांना एकत्र करून राक्षस नावाची टोळी तयार केली, जेणेकरून त्यांच्यात आपापसात भांडण होऊ नयेत आणि देवगण त्यांचा फायदा घेऊ नयेत. दानव आणि दैत्यांचा उत्तराधिकारी म्हणून रावण स्वतःला म्हणवू लागला आणि सोन्याची लंका उभी केली. रावण असो वा त्याचा मुलगा मेघनाद, कुंभ करण असो वा बिभीषण! हे सगळे राक्षस कुळातील मानले जातात.
ऋषी कश्यपांपासून उगम पावलेल्या दैत्य आणि दानव या कुळात अधर्म करणाऱ्या आणि देवाविरोधात जाणाऱ्या मायावी जणांना असुर म्हंटले गेले आहे. पुढेच त्या अधर्मी जणांना राक्षस म्हणून संबोधले गेले.