दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरांच्या पदरी निराशा
इंदापूर/सिद्धार्थ मखरे: विजयादशमी, दसरा आणि झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे दसरा सणाच्या पूर्वसंध्येला इंदापूर शहरातील मुख्य मार्गांवर केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या राशी पडल्या आहेत. सणासाठी झेंडूची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असली तरी यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळू शकला नाही.
गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकरी फुले विक्रीसाठी बाजारात आणू शकले नाहीत, तर भिजलेल्या फुलांना कवडीमोल दर मिळत होता. पाऊस ओसरल्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू बाजारात आणला, परंतु अचानक झालेल्या आवकीमुळे दर खाली आले. झेंडूला ७० रुपयांना किलो तर १०० रुपयांना दीड किलो या दराने विक्री झाली. यामुळे खर्च भागवणे कठीण झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
“पावसामुळे बरीच फुले शेतातच नासली, उरलेली बाजारात आणली तरी ७०–१०० रुपयांचा दर मिळतोय. मेहनतीला न्याय मिळत नाही,” असे शेतकरी अशोक घोडके यांनी सांगितले. तर “दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात आवक झाली, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे दर टिकला नाही. ग्राहकांची मागणी जरी होती तरी पुरवठा खूप वाढल्याने भाव कमी झाले,” असे विक्रेते निहाल बागवान यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे गुलाब, शेवंती, आस्टर, गुलछडी आदी फुलांना समाधानकारक भाव मिळाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर गोंडे, तोरणासाठी लागणारी पाने आणि झेंडूच्या माळा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. एकीकडे सणाचा उत्साह शिगेला असताना दुसरीकडे झेंडूला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी निराश झालेले दिसले.