लहान वयात का वाढतेय लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
Childhood Obesity: लहान मूल गोंडस दिसतंय, त्याचं वजनही छान वाढतंय, असं म्हणत अनेकदा पालक मुलांच्या वाढत्या वजनाकडे आनंदाने पाहतात. मात्र, हेच वाढतं वजन भविष्यात आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण देऊ शकतं, याची जाणीव अनेकदा होत नाही. चुकीच्या आहाराच्या सवयी, मैदानी खेळांचा अभाव आणि वाढता स्क्रीन टाइम यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. मुंबईतील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात गेल्या तीन वर्षांत लठ्ठपणाने ग्रस्त सुमारे ३०० मुलांची नोंद झाली असून, दरवर्षी सरासरी १०० मुले उपचारासाठी येत आहेत. बालपणातील लठ्ठपणा भविष्यात अनेक आरोग्यसमस्यांना निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. याविषयी बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक आणि पेडिएट्रीक-एंडोक्रायनोलॅाजिस्ट डॉ. सुधा राव यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
लठ्ठपणामुळे मुलांमध्ये टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॅालची पातळी वाढणे, यकृतामध्ये चरबी साठणे, झोपेत श्वास घेण्यास अडथळे येणे आणि सांधेदुखी अशा समस्या उद्भवू शकतात. किशोरवयीन मुलींमध्ये वाढलेले वजन आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे मासिक पाळी अनियमित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या लक्षणांकडे केवळ वयात येण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
जगभरात गेल्या तीन दशकांत लहान मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. २०२२ मधील अंदाजानुसार, भारतात ५ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे ३.४ टक्के मुले आणि किशोरवयीन मुलं लठ्ठपणाने प्रभावित होती. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, पाच वर्षांखालील मुलांमध्ये सुमारे २.७ टक्के, ५ ते ९ वर्षे वयोगटातील ४.२ टक्के आणि १० ते १९ वर्षे वयोगटातील ५ टक्के मुलांमध्ये अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणाची समस्या आढळते. शहरीकरण, बैठी जीवनशैली आणि बदलत्या आहाराच्या सवयी यामुळे काही समुदायांमध्ये हा धोका अधिक असू शकतो.
बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक आणि पेडिएट्रीक-एंडोक्रायनोलॅाजिस्ट डॉ. सुधा राव यांनी सांगितले, वाडिया बाल रुग्णालयाच्या बाल-एंडोक्रायनोलॅाजी विभागात गेल्या तीन वर्षांत लठ्ठपणाने प्रभावित सुमारे ३०० मुले आणि किशोरवयीन रुग्ण उपचारासाठी आले आहेत. दरवर्षी सरासरी १०० मुलांची नोंद होते. म्हणजेच बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये दररोजच्या कामकाजात लठ्ठपणाशी संबंधित समस्या सातत्याने समोर येत आहेत.
आमच्या वैद्यकीय अनुभवात ८० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये जीवनशैलीशी संबंधित लठ्ठपणा दिसून येतो. या मुलांमध्ये लठ्ठपणा मागे कोणतेही स्पष्ट हार्मोनल किंवा आनुवंशिक कारण आढळत नाही. त्यामुळे प्रत्येक लठ्ठ मुलाला हार्मोनल विकार आहे, असे समजणे चुकीचे आहे. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे जीवनशैलीत केलेले बदल हे उपचाराचे प्रमुख आधार आहेत.
काही मुलांमध्ये लठ्ठपणामागे इतर वैद्यकीय कारणे असू शकतात. अगदी लहान वयातच लठ्ठपणाची समस्या निर्माण होते, वजन खूप वेगाने किंवा अनपेक्षितपणे वाढते, अपेक्षेप्रमाणे उंची न वाढणे, विकासाशी संबंधित अडचणी किंवा शरीराच्या ठेवणीत असामान्य बदल दिसणे ही लक्षणे असल्यास सखोल वैद्यकीय तपासणी आवश्यक ठरू शकते.
डॉ. राव यांनी पुढे सांगितले, लठ्ठपणाशी संबंधित गुंतागुंत बालपणातच सुरू होऊ शकते. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे पुढे प्री-डायबिटीज किंवा टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल मधील असंतुलन, यकृतामध्ये चरबी साठणे आणि झोपेत श्वास घेण्यास अडथळे येणे या समस्या उद्भवू शकतात. किशोरवयीन मुलींमध्ये वाढलेले वजन आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा काही काळ बंदही होऊ शकते. यासोबतच पीसीओएस म्हणजे अंडाशयांशी संबंधित हार्मोनल समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या लक्षणांमध्ये वयानुसार आपोआप सुधारणा दिसून येतील, असे समजून दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.
मुलांचे वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर आहारासंबंधी खुप बंधन घालणे किंवा त्यांना वजनावरून दोष देणे योग्य नाही. त्याऐवजी संपूर्ण कुटुंबाने आरोग्यदायी सवयी स्वीकारणे गरजेचे आहे. घरगुती आणि संतुलित आहार, फळे व भाज्यांचा समावेश, गोड पेये आणि हवाबंद डब्यातील पदार्थांचे मर्यादित सेवन, दररोज शारीरिक हालचाल, मनोरंजनासाठी स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ कमी करणे आणि पुरेशी झोप यावर भर द्यायला हवा. मुलांच्या दिनचर्येत सहजपणे पाळता येतील असे बदल केल्यास त्यांचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.
“पालक, शाळा आणि आरोग्यतज्ज्ञ या सर्वांची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. मुलांचे वजन कमी करणे एवढाच यामागील उद्देश नसून त्यांची निरोगी वाढ सुनिश्चित करणे आणि भविष्यात मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. लहान वयातील लठ्ठपणा टाळता येऊ शकतो आणि त्यावर उपचारही शक्य आहेत. त्यासाठी वेळीच समस्या ओळखणे, आवश्यक तपासण्या करणे आणि कुटुंबाचा योग्य आधार मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
मुलांमधील लठ्ठपणाचे वेळेत निदान आणि योग्य उपचार करता यावेत, यासाठी वाडिया बाल रुग्णालयात दर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत लठ्ठपणासाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. तसेच लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजेच चयापचयाशी संबंधित विकार यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी रुग्णालयात संशोधनही सुरू आहे.
वाडिया ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले, मुलांमधील लठ्ठपणा कडे हा एक शारीरीक दोष किंवा ती एक लाजिरवाणी बाब म्हणून न पाहता, योग्य वेळी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि वेळीच वैद्यकीय मार्गदर्शन यांचे महत्त्व समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लहानपणापासूनच आहाराच्या चांगल्या सवयी लावल्यास मुलांना भविष्यात अधिक निरोगी आयुष्य जगण्यास मदत होऊ शकते.
Ans: असंतुलित आहार, गोड पेये व जंक फूडचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढलेला स्क्रीन टाइम, अपुरी झोप आणि आनुवंशिक घटक यांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.
Ans: दिलेल्या वृत्तानुसार, वाडिया रुग्णालयात तीन वर्षांच्या कालावधीत लठ्ठपणाशी संबंधित ३०० बालरुग्णांची नोंद झाली आहे.
Ans: मुलांचे वय, लिंग, उंची आणि वाढीचा आलेख लक्षात घेऊन डॉक्टर BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्सचे मूल्यांकन करतात. प्रौढांसाठी वापरले जाणारे BMI निकष मुलांना थेट लागू होत नाहीत.






