टीबीपासून दूर राहण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
गर्भधारणेदरम्यान गर्भवती महिलेच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीत बदल होतात, त्यामुळे महिलांना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशावेळी क्षयरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. वेळीच निदान व योग्य उपचार केल्यास आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित ठेवता येते.
काय आहे टीबीची लक्षणे
क्षयरोग हा जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून तो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीराच्या इतर अवयवांवरही त्याचा परिणाम शकतो. संक्रमित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना हवेतून हा आजार पसरू शकतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येणे, ताप, रात्री घाम येणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत.
काय म्हणतात तज्ज्ञ
डॉ. मधुलिका सिंग, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, अंकुरा हॉस्पिटल्स, पुणे यांनी सांगितले की, म्हणाल्या, गर्भवती महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, कुपोषण, अॅनिमिया किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर येणे यामुळे क्षयरोगाचा (टीबी) धोका वाढतो. अनेक वेळा गर्भावस्थेतील सामान्य तक्रारी समजून लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि निदान उशिराने होते. उपचार न केल्यास आईला तीव्र अशक्तपणा, श्वसनाचे त्रास, तसेच प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होऊ शकते. बाळामध्ये जन्मतः वजन कमी असणे, अकाली जन्म किंवा क्वचित प्रसंगी संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे क्षयरोगाचा धोका असलेल्या महिलांनी वेळीच तपासणी करणे गरजेचे आहे.
थेट परिणाम
डॉ. मधुलिका पुढे सांगतात की, टीबीमुळे आईचे आरोग्य बिघडल्यास त्याचा थेट परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. वेळेवर उपचार न केल्यास कमी वजनाची बाळे आणि प्री-टर्म डिलिव्हरीची प्रकरणे आढळून येतात. क्षयरोगाची औषधे गर्भावस्थेत सुरक्षित असतात आणि पूर्ण उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंबाचा आधार, योग्य आहार आणि नियमित तपासणी यामुळे उपचार अधिक प्रभावी होतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे आणि टिबीचे उपचार वेळीच सुरू करावेत.






