साहित्य :
बारीक रवा – १ कप
मीठ – चिमूटभर
तेल किंवा तूप – २ टेबलस्पून + पुऱ्या तळण्यासाठी आणखीन
दही – ३ चमचे
साखर – १ कप
लिंबाचा रस – १ चमचे
केशर – १/४ चमचे
वेलदोड्याची पूड – १/४-१/२ चमचे
केशरी खायचा रंग (ऐच्छिक) – आवडीप्रमाणे
पिस्त्याची भरड पूड (ऐच्छिक) – आवडीप्रमाणे, वरून पसरवणे
कृती :
रव्यात चिमूटभर मीठ, आणि २ चमचे तेल किंवा तूप गरम करून मिसळून घ्या. आता त्यात दही घालून घट्टसर भिजवून घ्या व अर्धा तास झाकून ठेऊन द्या. अर्ध्या तासांनी जर रवा जर कोरडा वाटला तर थोड्याश्या पाण्याचा हात लाऊन परत मळून घ्या. मात्र जास्त मऊ होऊ देऊ नका, गरज वाटली तरच पाण्याचा हात लावा. आता रव्याचे छोटे छोटे भाग करून, प्रत्येक भाग हातामध्ये फिरवून चपटा करून घ्या. प्रत्येक भागाची किंचित जाडसर पुरी लाटून घ्या.
तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा व पाक ही करायला घ्या. पाकासाठी एका पातेल्यात साखर व १/२ कप पाणी मिसळून घ्या. आता मध्यम गॅसवर ठेवा व साखर विरघळेपर्यंत हालवत राहा. मग उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर २ मिनिटे असेच मध्यम आचेवर उकळू द्या व मग गॅस बारीक करा.
आता पाकात लिंबाचा रस, वेलदोड्याची पूड, केशर, व आवडत असल्यास केशरी रंग घालून मिसळून घ्या. मग गॅस बंद करा. आता तेल तापले असेल. मध्यम आचेवर थोड्या पुऱ्या किंचित लालसर होईपर्यंत तळून घ्या. मग गॅस बारीक करा व तळणं थोडं थांबवा. आता तळलेल्या पुऱ्या गरम पाकात टाका व चमच्याने प्रत्येक पुरीवर पाक घाला. आता परत तेलाचा गॅस मोठा करून पुढच्या पुऱ्या लाटायला घ्या. व ह्या पुऱ्या तळेपर्यंत पहिल्या पुऱ्या पाकात राहू द्या.
दुसया बॅच च्या पुऱ्या तळायला टाकायच्या आधी पाकतल्या पुऱ्या एका ताटलीत काढून घ्या. अश्या पद्धतीने सर्व पुऱ्या थोड्या थोड्या करून टाळून घ्या व टाळत टाळत गरम पाकात टाकत राहा. मध्ये जर पाक कोमट झाला तर त्यात १ चमचा पाणी घालून परत अगदी मंद आचेवर पाक गरम करून घ्या. सर्व पुऱ्या तयार झाल्यावर, आवडत असेल तर वरून थोडी पिस्त्याची पूड पसरून घाला व खुसखुशीत पाकतल्या पुऱ्या खायला घ्या. ह्या पुऱ्या रूम टेम्प्रेचर वर ३-४ दिवस सुद्धा छान टिकतील.