यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा (12th Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (SSC March 2024) घेण्यात येणारी परिक्षा फेब्रुवारी / मार्च 2024 दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना लागणारे हॉलतिकीट (SSC Exam Hall ticket) मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरुपामध्ये हे हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना सोमवार दि. 22 रोजी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले हॉल तिकीट द्यावेत. तसेच हॉल तिकीटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामुळे ऑनलाईन हॉल येणार आहेत. सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेची ऑनलाईन हॉलतिकिटे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हे ऑनलाईन हॉल तिकीट घेताना जर काही त्रुटी आढळून आल्यास हॉल तिकीट गुगल क्रोम मध्ये ओपन करावे. हॉल तिकीट विद्यार्थ्यांना प्रिंट करून देण्यासाठी कॉलेजने कोणतेही शुल्क आकारू नये. तसेच हॉल तिकीटाची प्रिंट काढल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करुन घेणे गरजेचे आहे.
हॉल तिकीटमधील दुरुस्ती असल्यास ’हे’ करावे
हॉल तिकीटावरील फोटो चुकीचा किंवा सदोष असेल तर विद्यार्थ्यांनी त्यावर स्वतःचा फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे. नाव,फोटो व स्वाक्षरी बाबतीत असणारे बदल शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर करावे आणि प्रत विभागीय मंडळाकडे शाळेने त्वरित पाठवावी. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांमध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. हॉल तिकीट गहाळ झाले तर उच्च माध्यमिक संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा हॉल तिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्याकडे हॉल तिकीट द्यावे अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे.