चिपळूण पोलिसांचा मद्यपींना दणका (फोटो- सोशल मीडिया)
चिपळूण पोलिसांचा मद्यपींना दणका
चार दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा
बहादुरशेख नाका परिसरात केली कारवाई
चिपळूण: नववर्षांच्या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चिपळूण पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. बहादुरशेख नाका परिसरात राबविण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चार दुचाकीस्वारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ ते ०५/२०२६ नोंदविण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, रात्री ९.१५ वाजता बहादुरशेख नाका येथे नाकाबंदी दरम्यान शैलेश सुरेश हिवाळकर (वय ३६, रा. खेर्डी, चिपळूण) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.०१ डीयू ७३९४) मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत चालविताना आढळून आला.
या प्रकरणी पांडुरंग शिवराम जवरत यांनी फिर्याद दिली. यानंतर रात्री ९.३० वा., दिनेश रामेश्वरसिंग (वय ३२, रा. खेर्डी, चिपळूण) हा दुचाकी (एम.एच.०८ ए.टी.१२३१) चालवित असताना मद्यधुंद अवस्थेत सापडला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन शिवाजी देशमुख यांनी फिर्याद दाखल केली.
तिसऱ्या प्रकरणात रात्री १०.०० वाजता, शेषांश कुमारसिंग (वय २७, रा. खेडर्डी विकासवाडी, चिपळूण) हा दुचाकी (एम.एच.०८ ए.यू.७३३६) मद्यप्राशन करून चालविताना मिळून आला. या घटनेत पोहेकों गणेश भागवत नाळे हे फिर्यादी आहेत. चौथ्या कारवाईत रात्री ११.०० वाजता, इंद्रजीत हनमंतराव पवार (वय २९, रा. समर्थनगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) हा दुचाकी (एम.एच.५० यू ८१४१) मद्यधुंद अवस्थेत बहादुरशेख नाका येथे वाहन चालविताना पकडण्यात आला. याप्रकरणीही पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन शिवाजी देशमुख यांनी फिर्याद दिली.
अन्यथा कठोर कारवाई; पोलिसांनी दिला इशारा
सर्व आरोपीविरोधात मद्यपान करून वाहन चालविणे या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली असून पुढील तपास चिपळूण पोलीस ताण्याच्या वतीने करण्यात येत आहे. नववर्ष साजरे करताना नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, महाप्राशन करून वाहन चालवू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा चिपळूण पोलिसांनी दिला आहे.






