आषाढी एकादशीनिमित्त एसटी प्रशासनाकडून जोरदार तयारी; दहा दिवस दररोज धावणार 135 बसेस (फोटो सौजन्य - X)
छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. त्यासाठी मराठवाड्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक रवाना होतात. राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने यासाठी नियोजन केले असून, तब्बल दहा दिवस दररोज १३५ बसेस येथून धावणार आहेत, अशी माहिती वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.
पंढरपूरला विठ्ठल-रुख्माईची ही यात्रा २ ते १३ जुलैपर्यंत भरणार आहे. यात्रा कालावधीत या बस सोडण्यात येतील. येथूनच विदर्भातून आलेले भाविकही एसटीने पंढरपूरला जातात. भाविकांची मोठी गर्दी पाहता प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखाचा व्हावा, या दृष्टीने जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आगारातून मोठ्या प्रमाणात भक्त जातात.
दरम्यान, मराठवाड्यासह इतर भागातील प्रवाशांसाठी ही सोय करताना ज्या मार्गावरील भारमान जास्त आहे. तेथील फेऱ्या पूर्ववत ठेवत भारमान कमी असलेल्या मार्गावरील बसच्या फेऱ्या कमी करून त्या पंढरपूरला वळवण्यात येणार आहे, अशीही माहिती घाणे यांनी दिली.
वाढीव बस सोडणार
ऐनवेळी जास्त गर्दीमुळे मागणी वाढली तर तात्काळ वाढीव बस सोडल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानक आगारातून पंढरपूरला रवाना होणाऱ्या प्रवाशांसाठी २५. सिडको बसस्थानक येथून ३०, पैठणहून २०, सिल्लोड येथून २०, वैजापूरहून १०, कन्नडहून १०, गंगापूर येथून १० तर सोयगाव बस्टेंडवरून १० अशा १३५ बस रवाना होणार आहेत.