अमरावती : यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच तीव्र उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे, आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मनपा अग्निशमन विभागाचे अधीक्षक सैय्यद अनवर यांच्या नुसार मार्च पासून आतापर्यंत दीड महिन्यात १३५ छोट्या मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. मार्च महिन्यात तब्बल १०० घटना तर एप्रिलच्या सुरूवातीच्या ११ दिवसात ३५ घटना झाल्या आहेत. यात जीवीतहानी झाली नाही मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनापासून बचाव करण्याकरिता फायर ऑडीट करणे आवश्यक आहे. मात्र, आस्थापना संचालक उदासीन दिसून येत आहे.
खासगी शिकवणी वर्गाचे ऑडीट नाही
शहरात गल्ली बोळात खासगी शिकवणी वर्ग चालविले जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने शिकवणी संचालक थोडेही गंभीर नाहीत. शहरातील कोणत्याही शिकवणी संचालकाने अद्याप फायर ऑडीट केले नाही. २०१९ मध्ये गुजरातच्या सुरत येथे शिकवणी वर्गाला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. अमरावती देखील काही दिवसांपूर्वी बसस्थानक मार्गावरील शिवाजी कर्मशिलय संकुलात एका दवाखान्याला आग लागली. यावेळी अडीचशे विद्यार्थी सुखरूप बचावले. अशा घटना होत असताना देखील शिकवणी वर्ग संचालक विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळत असल्याचे दिसून येत आहे.
केवळ १०-१२ हॉटेलचे ऑडीट
शहरात हॉटेल्सची संख्या मोठी आहे. मात्र, केवळ १० ते १२ हॉटेल्स संचालकांकडून फायर ऑडीट करीत सुरक्षा प्रणालीचा अवलंब केल्याची माहिती मनपा अग्नीशमन विभागाकडून प्राप्त झाली आहे. शहरात तब्बल २२५ रुग्णालय आहे, त्यापैकी २०० पेक्षा अधिक रुग्णालयांचे फायर ऑडीट आहे.
७ दिवसांची मुदत – सैयद अनवर, अधीक्षक
महापालिका क्षेत्रातील खासगी शिकवणी संचालक, शाळा, रुग्णालय, हॉटेल्स, मंगल कार्यालय तसेच अन्य आस्थापनांना सात दिवसांच्या आत फायर ऑडीट करीत अग्नीशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्राप्त करुन घ्यावे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे. अद्याप कोणी ही अर्ज केलेला नाही.






