अहमदनगर : मागील महिन्यात ऊसतोड मुकादमास लूट प्रकरणाचा छडा लावण्यास गुन्हे अन्वेषण शाखेस (CID) यश आले असून, गुन्ह्यातील चारही आरोपींना जेरबंद करत पाच लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ, मोबाईल असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ऊसतोड कामगार मुकादम संतोष शहादेव बर्डे आणि त्यांचे भाऊ बबन बर्डे हे मोटारसायकलवर पुण्याहून करंजी घाटमार्गे पाथर्डीकडे जात असताना त्यांना स्कॉर्पिओ वाहनातून पाळतीवर असलेल्या चौघांच्या टोळीने करंजी घाटात वाहन आडवे लावून त्यांच्याकडील सात लाखांवर रक्कम लुटली होती. याबाबत मागील महिन्यात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याचा तपास पाथर्डी पोलिसांसह समांतर तपास जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा करत होती.
गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हा गुन्हा पप्पू दराडे उर्फ प्रवीण दिलीप दराडे, अंबादास नारायण नागरे, तात्याबा पोपट दहिफळे, दत्तू बाबा सातपुते यांनी केल्याचे समजले. या सर्वांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून, पुढील तपासासाठी आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हा तपास नाशिक परिक्षेत्राचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सोपान गोरे, मनोहर शेजवळ, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, संतोष लोढे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, विश्वास बेरड, योगेश सातपुते, सागर ससाणे आदींनी केला.