
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
22 Aug 2026 10:31 AM (IST)
टेक कंपनी पोकोने भारतात 7900mAh बॅटरीसह एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Poco M8x 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस M8 सीरीजचा तिसरा स्मार्टफोन आहे, जो कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने या सिरीजमध्ये Poco M8 5G आणि Poco M8 Power स्मार्टफोन लाँच केले आहेत.
22 Aug 2026 10:21 AM (IST)
आयुष्यात अनेकदा आपल्याला असे वाटते की, एक वाईट निकाल आपले संपूर्ण भविष्य ठरवतो, पण वास्तवात तो केवळ एक टप्पा असतो, संपूर्ण यश नाही. ही अशीच कथा आहे जैनेंद्रजीत यांची, ज्यांनी दहावीच्या वर्गात मिळालेल्या कमी गुणांना आपली कमजोरी बनवण्याऐवजी नव्या बदलाची सुरुवात केली. त्यावेळी कदापि त्यांना अंदाज नसेल की, हाच निकाल भविष्यात त्यांची सर्वात मोठी ताकद बनेल. एका सामान्य मुलाने कशा प्रकारे अपयशाला हिमतीत बदलले आणि देशातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला, हे जाणून घेऊया.
22 Aug 2026 10:11 AM (IST)
टेक कंपनी iQOO ने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन iQOO Z11S या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये तब्बल 10,000mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन भारतात किंवा दुसऱ्या देशात लाँच केला जाणार की नाही, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहिर केली नाही. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
22 Aug 2026 09:35 AM (IST)
Delh Rain alrt : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. शनिवारी सकाळी दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, रस्त्यांवर पाणी जमा होत आहे.
हवामान विभागाने सकाळ ते दुपार दरम्यान काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. मोती बाग, फिरोज शाह रोड, एपीजे अब्दुल कलाम रोड आणि मंदिर मार्ग यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत कमाल तापमान ३२°C ते ३४°C आणि किमान तापमान २४°C ते २६°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
22 Aug 2026 09:30 AM (IST)
NSUI ABVP Clash : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उद्या होणाऱ्या 'छात्रों की गुंज' (Chhatron Ki Goonj Pune) या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. भाजपची विद्यार्थी संघटना 'अभाविप' आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना 'एनएसयूआय' यांच्यात जोरदार खटपट आणि हाणामारी झाली आहे.
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप एनएसयूआयच्या वतीने करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेस विद्यार्थी संघटना शुल्काबाबत चुकीची विधाने करून घाणेरडे राजकारण करत असल्याचा दावा अभाविपने केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या कार्यक्रमात राहुल गांधी तरुणांशी संवाद साधणार असून, त्याआधीच झालेल्या या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
22 Aug 2026 09:30 AM (IST)
India vs Sri Lanka 2nd Test Preview: गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा १६५ धावांनी धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर, आता दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घालण्याचा भारतीय संघाचा मानस आहे.
कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत सर्वच विभागांत दमदार कामगिरी केली. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली, तर गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची अक्षरशः कोंडी केली. विशेषतः मानव सुथारने दोन्ही डावांत मिळून तब्बल १० बळी (विकेट्स) घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम संघ निवडताना संघ व्यवस्थापनासमोर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे आव्हान असेल.
22 Aug 2026 09:25 AM (IST)
Rahul Narwekar On Gen Z: महाराष्ट्रातील 'जेन-झी' (Gen-Z) पिढी ही महाराष्ट्रासोबतच आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका या कधीही कुठल्या 'ऑपरेशन'साठी होत नाहीत, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'जेन-झी' पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
"कोणत्याही पक्षाने अंतर्गत लोकशाहीचा वापर करून आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या, तर पक्ष फुटणारच नाहीत," अशी टिप्पणी नार्वेकर यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सुनावणी सुरू असतानाच त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, धनुष्यबाणाबाबतचा खटला न्यायप्रविष्ट असल्याने आणि आपण विधानसभा अध्यक्ष व कायद्याचे विद्यार्थी असल्याने यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
22 Aug 2026 09:20 AM (IST)
Mumbai FDA Action: अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत मोठी कारवाई करत कुलाबा येथील मॅकडोनाल्ड्स कियोस्कसह तब्बल १३ उपाहारगृहांचे परवाने रद्द केले आहेत. एफडीएच्या पथकाने केलेल्या अचानक पाहणीत या ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले आहे.
१९ ऑगस्ट रोजी टाकलेल्या धाडीत बॉम्बे प्रेसिडन्सी रेडिओ क्लब लिमिटेडमध्ये ४७ टक्के नियमांचे उल्लंघन आढळले. तपासणीदरम्यान तेथे माशांचा वावर, मेलेले झुरळ आणि भांडी धुण्याच्या जागी कॉक्रोच ट्रॅप आढळून आले. याशिवाय रेडिओ क्लब आणि स्टेटस उपाहारगृहावरही ही कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर 'एफडीए'ने कठोर पाऊल उचलल्याने उपाहारगृह चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
22 Aug 2026 09:15 AM (IST)
Vishakha Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा मुंबई महापालिकेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. हे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव अजून मुंबई महापालिका सभागृहात मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पालिका सभागृहात हा विषय मांडल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा होऊन पुढील अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
22 Aug 2026 09:10 AM (IST)
Prithviraj Chavan On Modi Government: दिल्लीतील 'जेन झी'च्या आंदोलनाने मोदी सरकारची झोप उडवली असू ही सरकारच्या शेवटाची सुरुवात झाली आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये बोलताना केला. तरुण पिढीच्या वाढत्या असंतोषाकडे सातत्याने वाढत आहे. केंद्रातील आगामी सत्ताबदलासाठी कोणताही राजकीय पक्ष किंवा विरोधी गट जबाबदार नसून, स्वतः नरेंद्र मोदींचा कारभारच त्याला कारणीभूत असेल. अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
22 Aug 2026 09:05 AM (IST)
Rahul Gandhi Pune Visit: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज, २२ ऑगस्ट रोजी 'छात्रों की गूंज' या विशेष कार्यक्रमासाठी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून, 'आरटीओ' जवळील एआयएसएसएमएस (AISSMS) शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी तब्बल ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेसाठी ५०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच परिसरातील वाहतुकीवर ताण येऊ नये म्हणून सुमारे ७०० वाहतूक पोलिसांचा विशेष ताफाही तैनात करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चर्चेत आहेत. तर पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पोलिसांनी ३० अटींसह परवानगी दिली आहे. क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या सामन्यांसह आंतरराष्ट्रीय घडामोडींचीही उत्सुकता कायम आहे. अर्थव्यवस्थेत महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या व्याजदर धोरणाकडे लक्ष असून, शेअर बाजारावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारातील दबावाचा परिणाम दिसत आहे. महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण सध्या कमी असून, सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत पावसाची शक्यता कमी असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत.