
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
23 Jul 2026 10:40 AM (IST)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जयंती आहे. ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील थोर विचारवंत, पत्रकार, समाजसुधारक आणि जहाल राष्ट्रवादी नेते होते, ज्यांना जनतेने आदरपूर्वक ‘लोकमान्य’ ही पदवी दिली आणि ब्रिटिशांनी ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” ही सिंहगर्जना करणाऱ्या टिळकांनी लोकजागृतीसाठी ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली, तरुणांच्या शिक्षणासाठी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ व ‘फरग्युसन कॉलेज’ची स्थापना केली, तसेच लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवांची सुरुवात केली. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी प्रसिद्ध ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला आणि संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले.
23 Jul 2026 10:30 AM (IST)
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे आता देशातील राजकारण तापले आहे. २१ जुलै २०२६ रोजी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. तरीही, राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असून सातत्याने सुरू असलेल्या पेपर फुटीविरोधातील आंदोलनात सहभागी होत आहेत.
23 Jul 2026 10:20 AM (IST)
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या मित्राने प्रॉपर्टीच्या वादातून शिक्षिकेची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह घोटी येथे आढळून आला. या हत्याकांडात आरोपीने आपल्या तीन साथीदारांची मदत घेतली आणि हा हत्याकांड घडवून आणला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
23 Jul 2026 10:00 AM (IST)
सततच्या पावसामुळे आसामच्या अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पुरामुळे आणखी 21 जणांचा मृत्यू झाला असून, अंदाजे ५.६५ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. बिस्वनाथ, चराईदेव, धेमाजी, दिब्रुगड, गोलाघाट, जोरहाट, कामरूप, कामरूप महानगर, कार्बी आंगलोंग, नागाव, शिवसागर आणि तिनसुकिया जिल्ह्यांमधील ५६४६०० हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.
23 Jul 2026 09:20 AM (IST)
Salman Khan On Student Protest : दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन गेल्या महिन्याभरापासून सुरूच आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून 20 जुलैला या आंदोलनला हिंसक वळण लागलं. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज करण्यात आला तसेत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या गेल्या, लाठीचार्जदरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाले आहे.
या विद्यार्थी आंदोलनाला आता मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकरांनी पाठिंबा दिला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने याच संदर्भात एक पोस्ट शएर केली आहे. सलमानने विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत या प्रकरणावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टसह त्याने स्वत:च्या बालपणीचा शालेय जीवनातील एक फोटो शेअर केला आहे.
23 Jul 2026 09:20 AM (IST)
CJP Protest: "जंतरमंतर येथील शांततापूर्ण आंदोलनात मुद्दाम विघ्न आणण्यासाठी बाहेरून लोक पाठवले जात आहेत," असा खळबळजनक आरोप 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे.
अभिजित दीपके म्हणाले, "आम्ही गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलनाला बसलो आहोत. या एका महिन्यात असा कोणताही हिंसाचाराचा प्रकार घडला नव्हता. मात्र, आता हे आंदोलन जसे तीव्र होत आहे, तसतसे भारतीय जनता पक्ष (BJP) बाहेरून गुंडांना पाठवून लोकांना मुद्दाम भडकावण्याचे काम करत आहे."
आंदोलनात होणाऱ्या दगडफेकीबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, "दगडफेक करणारे हे भाजपचेच लोक आहेत. पोलीस स्वतः या ठिकाणी दगडांनी भरलेले ट्रक आणत आहेत. भाजपचे गुंड येतात, दगडफेक करतात आणि नंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांना बदनाम करतात."
23 Jul 2026 09:04 AM (IST)
CJP Protest: जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतरही वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते आशुतोष रांका यांनी जंतरमंतर परिसरातील आज सकाळचे ताजे फोटो शेअर करत पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "काल दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरबाहेर प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांवर अत्यंत कठोर कारवाई केली. या भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून लोकांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. तरीही, आज सकाळी जंतरमंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे."
23 Jul 2026 09:02 AM (IST)
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’ ही पुढील वर्षी म्हणजेच २०२७ पासून पूर्णपणे ऑनलाईन असेल. अर्थात जेईई मेनप्रमाणे ती देखील संगणकावर घेतली जाईल. ‘नीट‘मध्ये ‘ओएमआर’ शीट्सचा वापर पूर्णपणे बंद केला जाईल. पेपरफुटीच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली. परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी सुरूच राहणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली: पेपर लीक प्रकरण आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. बुधवारी सायंकाळी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) हजारो समर्थक पुन्हा एकदा जंतरमंतरवर एकत्र जमले होते. मोठा जनसमुदाय जमल्याने आंदोलनस्थळी पुन्हा एकदा दगडफेकीची घटना घडली. या हिंसाचारात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि इतर अनेक पोलीस कर्मचारी तसेच आंदोलक जखमी झाले आहेत.
रात्री उशीरापर्यंत आंदोलक आणि पोलीस प्रशासनामध्ये तुफान गोंधळ अन् तणावाचे वातावरण होते. मात्र, गुरुवारी सकाळच्या सुमारास येथील परिस्थिती काहीशी नियंत्रणात आणि सामान्य दिसत आहे. असे असले तरी आंदोलनस्थळी अद्यापही मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.